scorecardresearch

मुंब्रा पोलिस ‘त्या’ धाडीमुळे चौकशीच्या फेऱ्यात, ३० कोटींच्या धाडीत ६ कोटींची वसुली केल्याचा आरोप!

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागातील घरामध्ये पोलिसांनी धाड टाकून ३० कोटीपैकी ६ कोटी रुपये लुटून नेल्यासंबंधीचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

mumbai-poilce
मुंब्रा पोलिस 'त्या' धाडीमुळे चौकशीच्या फेऱ्यात, ३० कोटींच्या धाडीत ६ कोटींची वसुली केल्याचा आरोप! (प्रातिनिधीक फोटो)

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागातील घरामध्ये पोलिसांनी धाड टाकून ३० कोटीपैकी ६ कोटी रुपये लुटून नेल्यासंबंधीचे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसारीत झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या पत्रातील गंभीर आरोपांमुळे ठाणे पोलिसांनी याप्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची तयारी सुरु केली असून यामुळे मुंब्रा पोलिस चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी राहणारे फैजल मेमन यांच्या घरी मुंब्रा पोलिसांनी १२ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता धाड टाकली होती. मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक मदने यांनी ही धाड टाकली होती. त्यावेळेस त्यांच्यासोबत आणखी तीन खासगी व्यक्ती होते, असा दावा तक्रारदाराने केला आहे. या धाडीमध्ये मेमन यांच्या घरात ३० कोटींची रोकड पोलिसांना आढळून आली होती. प्रत्येकी एक कोटी प्रमाणे ३० बॉक्समध्ये रोकड बांधून ठेवण्यात आली होती. एवढी मोठी रोकड घरात सापडल्यामुळे हा काळा पैसा आहे. यामुळे तुझ्यावर धाड पडून सर्व पैसा जप्त होईल अशी भीती पोलिसांनी मेमन यांना दाखवून हे सर्व पैसे जप्त करून मुंब्रा पोलीस ठाण्यात नेले. तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये ३० कोटींचे हे ३० बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी मेमन यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागणे सुरुवात केली. अखेरीस ते दोन कोटी रुपये पोलीस अधिकाऱ्यांना देण्यास तयार झाले. मात्र पोलिसांनी दोन कोटी ऐवजी सहा कोटी रुपये काढून घेतले आणि उरलेले २४ कोटी रुपये मेमन यांना परत केले. एवढे पैसे का घेतले आहेत असे मेमन यांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना लाथ मारून बाहेर काढले असा आरोप त्या पत्रात तक्रारदाराने केला आहे. “या संदर्भात तक्रार प्राप्त झाली असून त्यानुसार चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. ” असं पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितलं आहे.

मेमन यांचा हा कष्टाचा पैसा असल्याचा तसेच पैसे वाटपावरून दोन पोलिसांमध्ये भांडणे झाल्याचा दावाही तक्रारदाराने केला आहे. याशिवाय, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या दालनात पैसे मोजण्यासाठी ठेवले होते आणि हे सर्व पोलीस ठाण्यातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंग यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली असून हे पत्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbra police raid leads to be interrogation rmt

ताज्या बातम्या