Mumbra Railway Accident 1 Year: मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वेगाड्यांमधून पडून ९ जून २०२५ मध्ये पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज वर्ष पूर्ण झाले आहे. या अपघातानंतर मध्य रेल्वेमध्ये सुधारणा होईल. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी काही भरीव उपाययोजना होईल असे प्रवाशांना वाटत होते. परंतु अजूनही ठोस अशा उपाययोजना झाल्या नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्या दिवशी नेमके काय घडले होते. मुंबई लोहमार्ग पोलिसांनी कोणता अहवाल तयार केला होता. याबाबत वृत्त वाचा…

मध्य रेल्वे मार्गावरून दररोज नागरिकांचा प्रवास सुरु होतो. त्याप्रमाणे त्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांचाही प्रवास सुरु झाला होता. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ तीव्र वळण होते. त्याचवेळी कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणारी आणि सीएसएमटी येथून कर्जतच्या दिशेने वाहतुक करणारी रेल्वेगाडी एकाचवेळी आल्यानंतर हा अपघात झाला. या घटनेत एकूण आठ प्रवासी रेल्वे रुळांवर पडले. तर सहा प्रवासी रेल्वेगाडीच्या डब्यात पडून जखमी झाले. रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही सामावेश होता.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक तीव्र वळणाविषयी देखील चर्चा सुरु झाली होती. याप्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरु होती. रेल्वेने एक अहवाल तयार केला होता. अपघात प्रवाशाच्या बॅगेमुळे झाल्याचे रेल्वेचे अधिकारी सांगत होते. याप्रकरणात गुन्हा दाखल नव्हता. रविवारी याप्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता आणि साहाय्यक विभागीय अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच लोहमार्ग पोलिसांनी एक अहवाल देखील तयार केला होता.

काय होते अहवालात पाहा…

व्हिजेटीआयने १४ ऑक्टोबरला पोलिसांना मुंब्रा अपघाताप्रकरणी अहवाल दिला. या अहवालाच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्याने मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांवर पाणी भरले होते. रेल्वे रुळांखालील खडी निघाली होती. तसेच जमीन आणि फलाट क्रमांक चार देखील खचला होता. याची माहिती अभियंत्यांना मिळाल्यानंतरही त्यांनी तेथील देखभाल दुरुस्ती केली नव्हती. तसेच ६ जूनला मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेरील नाला तुंबला होता. त्याचे पाणी फलाट क्रमांक तीन आणि चारमधील रेल्वे रुळांवर साचले होते. त्यामुळे वेग मर्यादा निश्चित केली होती होती. तो वेग कमी करणे आवश्यक होते.

दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान वळणाजवळ रेल्वेगाड्या घासल्याने हिसके लागत होते. ५ जूनला मध्यरात्री रेल्वे रुळ बदलण्यात आले. ज्या ठिकाणी रेल्वे रुळ बदलले तेथे जोडणी (वेल्डिंग) करुन रुळ व्यवस्थित करणे आवश्यक होते. परंतु जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे मुंब्रा स्थानकात फलाट क्रमांक चारच्या दिशेने जाणारी रेल्वेगाडी फलाट क्रमांक तीनच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या दिशेने झुकल्याचे नमूद आहे. दोन्ही मार्गिकेवरील रुळांमधील अंतर निश्चित प्रमाणापेक्षा कमी आढळून आले.

अभियंत्यांना दिलासा

अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावण्या झाल्या. लोहमार्ग पोलिसांनी ठाणे न्यायालयात अहवाल सादर केला. तसेच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करु नये असे म्हटले. तर या अहवालावर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. हा अहवाल योग्य नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. या प्रकरणानंतर न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळाला गेला. अखेर अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला होता. या प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी लोहमार्ग पोलीस दलाचे साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रनमाळे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.अपघानंतरही प्रवाशांना गर्दीचा फटका

या अपघातानंतर काही ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नाही असा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. दररोज सकाळी आणि रात्री अक्षरश: लटकून प्रवास करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.