ठाणे : गेल्या पंधरा दिवसांपासून मुंब्रा परिसरात पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी शनिवारी पालिका प्रभाग समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला. या दरम्यान, पालिका कार्यालयाच्या दारात मडकी फोडून नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच येत्या मंगळवार पर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाहीतर, पालिका मुख्यालयावर बुधवारी मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला. धरण क्षेत्रातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी दहा टक्के कपात लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> ठाणे कारागृहाच्या जागेवर उद्यान उभारणीच्या प्रस्तावाला वेग; भाजपाचा मात्र विरोध

या कपातीमुळे ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. तर, मुंब्रा परिसरात गेल्या १५ दिवसांपासून पाणीच येत नसल्यामुळे टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. याविरोधात पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळेस पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी दिले होते. यानंतरही पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यानिषेधार्थ सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया पठाण नागरिकांनी शनिवारी भर पावसात पालिका प्रभाग समिती कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला. यामध्ये नागरिक मोठ्या सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांनी पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या दारात मडकी फोडली. तसेच, गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडविले.