ठाणे : मुंब्रा रेतीबंदर भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार सगीर सलमान खान (२८) याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. अपघातात सगीर याचा मित्र जखमी असून याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भांडूप येथील सोनापूर भागात सगीर खान वास्तव्यास होता. रविवारी रात्री तो मित्र अब्दुल सत्तार रौफ खान (२०) याच्यासोबत कामानिमित्ताने दुचाकीने मुंब्रा स्थानक परिसरात आला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सगीर आणि अब्दुल दोघेही घरी परतत होते. रविवारी रात्री ९.४० वाजताच्या सुमारास येथील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात त्यांची दुचाकी आली असता, मागून भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात सगीर याच्या शरिरावरून ट्रकचे पुढील चाक गेले. तर अब्दुल हा दुचाकीवरून रस्त्यावर पडला. त्याच्या चेहऱ्याला आणि हाताला दुखापत झाली. या अपघातानंतर अब्दुल याने नागरिकांना मदतीसाठी बोलावले. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता मुंबई-नाशिक महामार्गाच्या दिशेने पलायन केले.
अब्दुल याने जखमी अवस्थेत सगीर याला एका रिक्षाने ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालायत उपचारासाठी नेले. परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अब्दुल याच्यावर उपचार झाल्यानंतर त्याने याप्रकरणी मुंब्रा पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे सोमवारी ट्रक चालकाविरोधात मोटरवाहन अधिनियम, १९८८ चे कलम १३४ (अ), १३४ (ब), १८४, १८७ तसेच, भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ चे कलम १०६ (१) आणि २८१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
