ठाणे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा येथील कौसा परिसरातील एम. एस. कंपाऊंडमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून ६० वर्षीय आमिर खान यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणाची नोंद शीळ-डायघर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

ठाणे शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार सरींमुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते, परिसर आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाले तुडुंब भरल्याने तसेच पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्यामुळे अनेक भाग जलमय झाले आहेत. असे असताना कौसा येथील एम. एस. कंपाऊंड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या कंपाऊंडमध्ये पाच ते सहा घरे असून ती रस्त्याच्या पातळीपेक्षा सुमारे सात ते आठ फूट खोलवर असल्याने पावसाचे पाणी थेट घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता.

याच कंपाऊंडमधील एका घरात आमिर खान (वय ६०) हे एकटे राहत होते. पावसाचे पाणी घरात शिरल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी सुमारे ५.२७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यातून आमिर खान यांचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे पाठविण्यात आला.त्यांची पत्नी आणि दोन मुले जवळपास ८०० ते ९०० मीटर अंतरावर राहत असल्याची माहिती आहे.