ठाणे : मुंब्रा येथील रेल्वे अपघात प्रकरणी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या अभियंत्यांंनी ठाणे न्यायालयात वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे अभियंत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील वळण मार्गावर कसारा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकाच्या दिशेने वाहतुक करणारी आणि सीएसएमटी येथून कर्जतच्या दिशेने वाहतुक करणारी रेल्वेगाडी एकाचवेळी आल्यानंतर अपघात झाला होता. ‘व्हिजेटीआय’ संस्थेने दिलेल्या अहवालानंतर मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि साहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी तात्काळ वकिलांमार्फत अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठाणे न्यायालयात अटकपूर्वी जामीनासाठी अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश टी. पवार यांच्यासमोर सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील बलदेवसिंह राजपूत यांनी काही सीसीटीव्ही चित्रीकरण सादर केले होते. तर हा अपघात रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्यास अभियंत्यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे झाल्याचे पोलिसांकडून न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला.

दोन्ही बाजूचा युक्तीवाद, सीसीटीव्ही चित्रीकरण पाहिल्यानंतर गुरुवारी न्यायाधीशांनी निकाल दिला असून दोन्ही अभियंत्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे यादव आणि डोळस या दोन्ही अभियंत्यांच्या अडचणी वाढणार आहेत. तर त्यांचे वकिल बलदेवसिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले.