ठाणे : मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणातील अटकपूर्व जामीन मागणाऱ्या दोन अभियंत्यांच्या वकिलांनी बुधवारी सरकारी वकिलांच्या दाव्यांना आव्हान दिले. या दुर्घटनेसाठी अभियंत्यांना जबाबदार धरणे दिशाभूल करणारे असल्याचे सांगितल्यानंतर आता गुरुवारी या प्रकरणाचा निकाल अपेक्षित आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश टी. पवार यांच्यासमोर सुनावणीदरम्यान, बचाव पक्षाचे वकील बलदेवसिंह राजपूत यांनी काही सीसीटीव्ही चित्रीकरण सादर केले आहेत.
मुंब्रा येथील अपघात प्रकरणातील अभियंत्यांच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी निकाल अपेक्षित होता. परंतु बुधवारी बचाव पक्षाचे वकील बलदेवसिंह राजपूत यांनी ११ चित्रीकरण सादर केले, त्यापैकी चार चित्रीकरणात रेल्वेगाड्या एकमेकांजवळून जाणाऱ्या दाखवल्या आहेत. त्यांनी पंचनाम्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामध्ये घटनास्थळी कोणत्याही बॅगा सापडल्या नाहीत असे नमूद केले होते. पंचनामा घटनेच्या दोन दिवसांनंतर करण्यात आला होता, त्यामुळे पुरावे अबाधित राहण्याची शक्यता कमी होते असाही युक्तीवाद यावेळी वकिल राजपूत यांनी केला. तसेच, घटनेच्या दिवशी त्याच ठिकाणाहून जाणाऱ्या २८ रेल्वेगाड्यांचे आणि जवळच्या स्थानकांमधील गर्दीचे सीसीटीव्ही चित्रीकरण वकिलांनी सादर केले. कसारा रेल्वेगाडीमध्ये गर्दी नव्हती या सरकारी वकिलांच्या दाव्याचेही त्यांनी खंडन केले. न्यायालय गुरुवारी जामीन अर्जांवर आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
