Mumbra Thane Train Accident : मध्य रेल्वेच्या मुंब्रा व दिवा स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून प्रवास करणारे सुमारे १३ जण पडल्याची घटना सोमवारी (९ जून) सकाळच्या सुमारास घडली. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांवर कळव्यातील रुग्णालयात उपचार चालू आहेत. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणारी लोकल दिवा स्थानकातून सुटल्यानंतर मुंब्र्याच्या आधी काही प्रवासी ट्रेनमधून पडले. सकाळी ९.२० च्या दरम्यान ही घटना घडली आहे.

लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे अनेक प्रवासी हे डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) उभे होते. त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या. दरम्यान, सीएसएमटीहून डाऊन दिशेने जाणारी लोकल या (कसारा-सीएसएमटी) ट्रेनच्या बाजूने जात होती. तेव्हा दरवाजात उभे असलेले प्रवासी बाजूने जाणाऱ्या ट्रेनच्या बाहेरील बाजूस घासले गेले, त्यांच्या बॅगा ट्रेनवर आदळल्या. या धक्क्यामुळे १३ प्रवासी एकामागोमाग एक खाली पडले.

Mumbra Train Accident location
मुंब्रा येथील रेल्वे अपघातात ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. (PC : Google Maps Screenshot)

अपघात कुठे झाला?

दरम्यान, बाजूने जाणाऱ्या ट्रेनला घासून प्रवासी खाली पडल्याची घटना पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे. दोन ट्रेनमध्ये (रुळांमध्ये) इतकं कमी अंतर सहसहा पाहायला मिळत नाही. मात्र, जिथे हा अपघात झाला ती जागा थोडी धोकादायक असल्याचं प्रवाशांनी सांगितलं. दिवा स्थानकातून सुटल्यानंतर ट्रेन दीड किमी अंतर पार केल्यानंतर वळण घेते. दिवा व मुंब्रा स्थानकांमध्ये बरंच अंतर असल्यामुळे या भागात ट्रेन भरदाव वेगाने धावत असते. ट्रेन वळण घेत असताना आतील प्रवाशी आपोआप दुसऱ्या बाजूला ढकलले जातात. त्यामुळे दरवाजात उभे असलेले प्रवासी दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान दरवाजात उभे राहत नाहीत. मात्र आज कसारा-सीएसएमटी ट्रेन इतकी तुडुंब भरलेली की मुंगीलाही आत शिरायला जागा नव्हती. परिणामी हा अपघात घडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Mumbra Train Accident location
दिवा व मुंब्रा स्थानकांदरम्यानचं धोकादायक वळण (PC : Google Maps Screenshot)

दरम्यान, हे वळण धोकादाक असल्याची बाब मुंब्रा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेख यांनी देखील उपस्थित केली. ते म्हणाले, “दिवा-मुंब्र्यादरम्यानचं वळण अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या वळणावरून जलद लोकल चालवणं योग्य नाही. मध्य रेल्वे प्रशासन येथून जलद लोकल का चालवतं तेच कळत नाही. कसाऱ्यावरून येणारी गाडी तुडुंब भरून आलेली असते. अशी भरधाव गाडी या वळणावरून चालवणं अत्यंत धोकादायक आहे. दरम्यान, हाच मुद्दा खासदार श्रीकांत शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील उपस्थित केला आहे.