ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान झालेल्या लोकल अपघातात एकूण १३ प्रवासी पडले. ज्या वळणावर हा अपघात घडला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे दिली असतानाही, त्याकडे दुर्लक्ष का केले गेले असा सवाल मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव रेल्वे प्रशासनाला विचारत त्यांची कानउघडणी केली.

मुंब्रा रेल्वे स्थानका दरम्यान सोमवारी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर, तर, नऊ प्रवासी जखमी झाले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मनसे आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी ठाणे स्थानकात धडक मोर्चा काढला. या मोर्चासाठी ठाणे स्थानक परिसराक मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावदेवी पासून सुरुवात झालेला हा मोर्चा ठाणे स्थानक परिसरातील सॅटीस खाली थांबला. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली.

यावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेतली. ज्या वळणावर हा अपघात घडला ते वळण धोकादायक असल्याची तक्रार तीन महिन्यांपूर्वी टिटवाळा येथील मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाला दिली होती. या तक्रारीकडे का दुर्लक्ष करण्यात आले याची लेखी माहिती मला सादर करा, असे म्हणत अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाची कानउघडणी केली. मुंबई लोकल मधील प्रवाशांची संख्या आणि त्याप्रमाणात गाड्यांमध्ये आसन क्षमता उपलब्ध आहे का याचा तक्ता मला सादर करावा, दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची लेखी माहिती द्यावी, रेल्वे अपघात नुकसान भरपाई रक्कम ही अत्यंत तुटपुंजी आहे ती वाढवून २५ लाख रुपये करावी असे विविध प्रश्न करत अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला वेठीस धरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या १५ वर्षामध्ये ४५००० प्रवासी अपघाती मृत्यू झालेले आहेत. त्यापैकी नुकसान भरपाई मिळण्या संदर्भातील ८००० केसेस अद्यापही प्रलंबित आहेत, त्याचे नक्की कारण काय ? एका डब्यामध्ये किती प्रवाशांनी प्रवास करणे रेल्वे प्रशासनाला अपेक्षित आहे याची नियमावली सादर करावी, वातानुकूलीत गाड्यांचा वेग हा तुलनेने इतर गाड्यांपेक्षा कमी आहे मग स्वतंत्र वातानुकूलीत गाडी चालवण्यापेक्षा प्रत्येक गाडीत काही डबे वातानुकूलीत ठेवायला हरकत काय ? असा सवाल देखील अविनाश जाधव यांनी रेल्वे प्रशासनाला केला.