भगवान मंडलिक
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आरक्षित भूखंड, विकास आराखडय़ातील रस्ते, सरकारी जमिनींवर बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांचा शोध घेऊन असे बांधकाम करणाऱ्यांचे सातबारा उतारे, मूळ मालकीच्या स्थावर मालमत्तेवर पालिकेचा बोजा चढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या बैठकीत घेण्यात आला.
महापालिका हद्दीतील उद्याने, बगिचे, क्रीडांगणे, सुविधा भूखंडांवर भूमाफियांनी बेकायदा इमले बांधले आहेत. ही बांधकामे करताना माफिया इमारतीची बनावट कागदपत्रे तयार करतात. त्या कागदपत्रांवर इमारत बांधकामधारक म्हणून स्वत:चे नाव टाकत नाही. अनेक ठिकाणी कामावरील पर्यवेक्षक, वाहन चालक, कामगारांची नावे टाकतात. पालिकेने अशा बेकायदा इमारतींवर कारवाई केली तरी मुख्य बांधकामधारक माफियांचे नाव पुढे येत नाही.
तिऱ्हाईत नावाने बेकायदा बांधकामे करणाऱ्या माफियांचा शोध घ्यायची मोहीम आता महापालिकेने सुरू केली आहे. हा शोध घेऊन अशी बांधकामे करणाऱ्यांच्या नावे असलेल्या मालमत्ता, मालकी हक्काचे खरे ७-१२ उतारे शोधून त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेचा हक्कदारीचा बोजा चढवायचा निर्णय आयुक्त सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला. तसेच संबंधित बांधकामधारकांकडून इमारत तोडल्याचा खर्च मालमत्ता कराद्वारे वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
अनधिकृत इमारतीसाठी चोरून पाणी वापरले जात असेल तर नळ जोडणी तोडून त्याने आतापर्यंत वापरलेल्या पाणी देयकाची सरकारी रक्कम काढून ती पाणी देयकात जमा करून वसूल करा. बांधकाम बेकायदा निष्पन्न झाले की संबंधित माफियांवर पोलीस ठाण्यात एमआरटीपीचा गुन्हा दाखल करा. बांधकामाशी संबंधित विकासक, वास्तुविशारद, पुरवठादार यांची नावे तपासासाठी पोलिसांना द्या, असेही निर्देश बैठकीत देण्यात आले.
अ (मांडा, टिटवाळा), ई (२७ गावे), ह (डोंबिवली पश्चिम), जी (डोंबिवली पूर्व), फ प्रभाग हद्दीत सर्वाधिक बेकायदा बांधकामे आहेत. या प्रभागांमधील ७० हून अधिक बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्यात याव्यात. बेकायदा बांधकामे तोडताना व भुईसपाट केल्यानंतरचे ड्रोनद्वारे छायाचित्रण करावे. अनधिकृत बांधकामांची विभागवार यादी सार्वजनिक ठिकाणी फलकावर लावावी, पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, असे आदेश देण्यात आले.
बोजा म्हणजे..
बोजा म्हणजे माफियांची मूळ मालकीची जमीन असते. त्या जमिनीचे सात-बारा उतारे असतात. मालमत्ता पत्रक असते. अशा माफियांच्या जमीन, मालमत्ता कागदपत्रांच्या इतर हक्कांमध्ये महसूल यंत्रणेच्या साहाय्याने सहकब्जेदार म्हणून कल्याण-डोंबिवली पालिकेचे नाव लावले जाणार. ज्यामुळे जमिनीचा कोणताही व्यवहार करताना माफियाला प्रथम पालिकेची परवानगी घ्यावी लागेल किंवा माफिया हा व्यवहार चोरून करत असेल तर महसूल यंत्रणा यासंदर्भात पालिकेला सावध करतील. माफियाने इमारत निष्कासनाचा खर्च पालिकेत भरणा केला नसेल, तर ती थकीत रक्कम मालमत्ता देयकात जमा करून वसूल केली जाईल.
अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची मोहीम सुरू आहे. काही ठिकाणी कागदोपत्री बनावट बांधकामकारक असल्याचे दिसून येते. मूळ मालक, वित्त पुरवठादार पडद्यामागे असतो. अशा बांधकामधारकांचा शोध घेऊन त्यांच्या तोडलेल्या इमारतींचा खर्च, पालिकेच्या मालमत्तेवर नियमबाह्य बांधकाम केले म्हणून त्याच्या सात-बारा उताऱ्यावर पालिकेचा बोजा चढविण्यात येणार आहे. -डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त