ठाणे पालिका आयुक्तांचा आदेश
ठाणे शहरातील नाल्यांवर उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांपाठोपाठ आता तळघरामध्ये असलेल्या हॉटेल्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कारवाईसाठी शहरातील हॉटेल्सची यादी तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले असून या यादीच्या आधारे पुढील पंधरा दिवसात संबंधित हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शहरातील अशा हॉटेल्सची नागरिकांकडून माहिती मिळावी म्हणून महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समित्यांमध्ये ‘पत्रपेटी’ची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय, दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्यामुळे शहरातील अशा हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या भागात हॉटेल्सची मोठी संख्या आहे. त्यापैकी काही हॉटेल्स व्यावसायिक कामासाठी तळघराचा वापर करतात. मात्र हा वापर बेकायदेशीर आणि धोकादायक आहे. अशा हॉटेल्समध्ये एखादी दुर्घटना घडली तर जिवीत हानी होऊ शकते. त्यामुळे तळघरातील बेकायदेशीर वापरासंबंधीच्या अनेक तक्रारी महापालिका आयुक्त जयस्वाल यांच्याकडे तसेच अतिक्रमण विभागाकडे वारंवार येऊ लागल्या आहेत. या तक्रारीवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्येही तळघराच्या गैरवापराविषयी जोरदार चर्चा झाली होती. या पाश्र्वभूमीवर आयुक्त जयस्वाल यांनी तळघरामध्ये सुरू असलेल्या हॉटेल्सवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईसाठी तळघरामध्ये सुरू असलेल्या हॉटेल्सची यादी सर्वच प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांकडून मागविण्यात आली असून ही यादी प्राप्त होताच पंधरा दिवसांत संबंधित हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, शहरातील वेगवेगळ्या भागात अशाप्रकारे सुरू असलेल्या हॉटेल्सची यादी प्रभाग समित्या तयार करणार असली तरी आयुक्त जयस्वाल यांनी या कारवाईमध्ये नागरिकांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागरिकांकडून अशा हॉटेल्सची माहिती मिळविण्यासाठी महापालिका मुख्यालय तसेच प्रभाग समितीमध्ये ‘पत्रपेटी’ ठेवली जाणार आहे. या पेटीमुळे नागरिकांना आता तळघरात हॉटेल्सची माहीती एका पत्राद्वारे गोपनीय पद्धतीने देणे शक्य होणार असून याच माहितीच्या आधारे महापालिका संबंधित हॉटेल्सवर कारवाई करणार आहे.