उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर
शहरांच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या फलकबाजीला चाप बसावा यासाठी फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना दिले आहेत. या आदेशानंतरही काही शहरांमध्ये राजकीय नेत्यांची फलकबाजी सुरूच आहे. पण या नेत्यांवर कारवाई करणे दूर, मीरा-भाईंदर महापालिका तर स्वत:च अशा प्रकारची फलकबाजी करत असल्याचे दिसून आले आहे. मीरा-भाईंदर महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या जाहिराचे फलक न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून शहरभर लावण्यात आले आहेत. आता या फलकबाजीवर कारवाई कोण करणार, असा सवाल सामान्य जनता विचारत आहे.
राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश, विविध कार्यक्रम, शिबिरे यांचे फलक बेधडकपणे कोणतीही परवानगी न घेता ठिकठिकाणी झळकत असतात. प्रसिद्धीसाठी झाडे, विजेचे खांब यांवर फलक लावले जात आहेत. शहराच्या विद्रूपीकरणात या अनधिकृत फलकांचा मोठा हात आहे. यासाठीच उच्च न्यायालयाने या अनधिकृत फलकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वेळोवेळी महापालिकांना दिले आहेत. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही शहरात आजही अनेक अनधिकृत फलक झळकताना दिसतात. यावर पालिका कोणतीही कारवाई करत नाही.
‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना’अंतर्गत मीरा-भाईंदर महापालिकेने रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची जाहिरात करणारे फलक झाडावरही लटकवण्यात आले आहेत. भाईंदर पश्चिमेकडील पालिकेच्या प्रभाग कार्यालयाजवळील एका झाडावरच हा फलक झळताना दिसून येत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांनुसार इतरांवर कारवाई करण्याआधी महापालिका प्रशासनाने स्वत:च या आदेशांचे पालन करावे, अशी मागणी पुढे येत आहे.