ठाणे महापालिकेचा बोनसचा तिढा सुटला; कंत्राटी कामगारांना एक महिन्याचे वेतन

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपये तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय प्रशासनाने अखेर घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या तिजोरीवर सुमारे १६ कोटी ४३ लाखांचा बोजा पडणार आहे. राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये सानुग्रह अनुदान जाहीर झालेले असतानाही ठाणे महापालिकेत मात्र त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. अखेर प्रशासनाने दिवाळीपूर्वीच सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह ९०८८ तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. तसेच सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. दिवाळी सणाच्या पाश्र्वभूमीवर या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येते. मात्र, राज्यातील महापालिकांनी सानुग्रह अनुदान जाहीर केले तरी ठाणे महापालिकेने मात्र त्याची घोषणा केली नव्हती. त्यामुळे म्युनिसिपल लेबर युनियनने कर्मचाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एक बैठक बोलावली होती. त्यास युनियनचे पदाधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षांत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगली सेवा देऊन निरिनिराळ्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत आणि महापालिकेच्या उत्पन्नात २१६ कोटी रुपयांची भर घातली आहे, असेही युनियनच्यावतीने सांगण्यात आले. अखेर चर्चेअंती कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार सानुग्रह अनुदान तर कंत्राटी कामगारांना एक महिन्याचा पगार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला, अशी माहिती म्युनिसिपल लेबर युनियनचे कार्याध्यक्ष रवी राव यांनी दिली.

पाच हजार रुपयांची विनंती फेटाळली

जकातपाठोपाठ स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. आर्थिक स्थिती खालावलेली असतानाही महापालिकेने आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता आदींद्वारे सुमारे ५० कोटी रुपयांचे वाटप केले आहे. यामुळे यंदा सानुग्रह अनुदान देणे कठीण आहे. परंतु, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदा पाच हजारांचे सानुग्रह अनुदान देऊ, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, ही मागणी फेटाळून लावत कर्मचारी गेल्यावर्षांपेक्षा कमी रक्कम स्वीकारणार नाहीत, अशी भुमिका युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती.