अंबरनाथ २ लाख तर बदलापूर नगरपालिका १ लाख लस खरेदी करणार

दोन्ही पालिकांची ६ कोटी खर्च करण्याची तयारी

बदलापूर : करोनाच्या संकटात आर्थिक संकटात सापडलेल्या मोठमोठय़ा पालिकांपुढे लसखरेदीसाठी आवश्यक निधीची कमतरता असतानाच अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकांनी मात्र लसखरेदीचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिका दोन लाख मात्रा तर कुळगाव बदलापूर नगरपालिका १ लाख मात्रा विकत घेणार आहे. त्यासाठी दोन्ही नगरपालिकांनी सुमारे ६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडावलेल्या लसीकरण मोहिमेला यामुळे बळ मिळण्याची आशा आहे.

चाकरमान्यांचे शहर म्हणून अंबरनाथ आणि बदलापूर शहराची ओळख आहे. एकटय़ा बदलापूर शहरातून दररोज अत्यावश्यक सेवेत काम करणारे सुमारे दहा हजार कर्मचारी, अधिकारी मुंबई, उपनगरांत प्रवास करत असतात. त्यामुळे करोना संसर्गाचा धोका सुरुवातीपासून या शहरांना आहे. लसीकरणाची मोहीम राज्यभरात सुरू झाल्यापासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतही लसीकरण सुरू झाले. अंबरनाथ शहरात आतापर्यंत १७ हजार ६९२ नागरिकांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. तर अवघ्या ३ हजार ९८३ नागरिकांना दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत १२ हजार १८७ नागरिकांना लशीची पहिली मात्रा मिळाली आहे. तर लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या नागरिकांची संख्या ४ हजार ६५ इतकी आहे. दोन्ही शहरांची लोकसंख्या सात ते साडेसात लाखांच्या घरात आहे. त्या तुलनेत लसीकरण अवघे काही टक्केच झाले आहे. त्यात गेल्या काही दिवसांत आठवडय़ातून एक किंवा दोनच दिवस लसीकरण सुरू राहत असल्याचे दिसून आले आहे. लशींचा अपुरा साठा हे यासाठी महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने करण्यासाठी काहीच दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांनी स्वत: लसखरेदी करण्याच्या सूचना केल्या होत्या. यातील काही महापालिकांनी लस खरेदीचा निर्णय घेतला. मात्र करोनाच्या संकटात बहुतांश महापालिकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे लसखरेदी त्यांच्या आवाक्यात आहे का असा सवाल उपस्थित होत होता. मात्र अनेक महापालिकांना मागे सारत महानगर क्षेत्रातील अ वर्ग नगरपालिका असणाऱ्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेने लसखरेदीचा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिका दोन लाख लसकुप्यांची खरेदी करणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली आहे. त्यासाठी सहा कोटी रुपयांची गरज असून त्याची तरतूद केली जाणार असल्याचेही रसाळ यांनी सांगितले आहे. तर कुळगाव बदलापूर नगरपालिकाही एक लाख लसकुप्या विकत घेणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिका दीपक पुजारी यांनी दिली आहे. या लसखरेदीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयांकडे पाठवण्यात आल्या आहे. त्यामुळे येत्या काळात दोन्ही शहरांतील थंडावलेल्या लसीकरण मोहिमेला वेग मिळण्याची आशा आहे.