बदलापूरः बारवी धरणाच्या शेजारी असलेल्या मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा या गावातील एका विहिरीतून मगरीची सुटका करण्यात वन विभागाला यश आले आहे. मासले बेलपाडा येथील तलावातून ही मगर शेजारच्या विहिरीत गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर निर्मानाधिन विहिरीतील पाणी उपसून ही मगर पकडण्यात आली. यामुळे मासले बेलपाडा ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. शोभेसाठी आणलेली ही मगर असावी, असा संशय आहे.
ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाशेजारचे जंगल हे संपन्न जंगल आहे. येथे अनेक प्राणी वास्तव्यास आहेत. बिबट्याचाही वावर येथे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र याच जंगलाच्या परिसरात शहरी भागात पकडलेले अनेक प्राणी आणून सोडले जात असल्याचे दिसून आले आहे. भटके श्वान, पकडलेले साप अधिवासात सोडण्याच्या नावाखाली या जंगल परिसरात आणून सोडले जातात. परिणामी हे क्षेत्र अशा प्राण्यांसाठीचे गोदाम असल्याचे जाणवते, असे येथील मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड सांगतात.
त्यामुळे या परिसरात प्राण्यांचा वावर वाढला असून त्यातच रविवारी येथील एका विहिरीत मगर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मुरबाडचे वनक्षेत्रपाल संजुदास राठोड, महेशकुमार शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मगरीची सुटका करण्यासाठी मोहिम राबवली. यावेळी मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना याकामी मदत केली. ही मगर साधारणतः २६.५ किलोग्रॅम वजनाची असून तिला पुढील उपचारासाठी आता मुंबईत पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
ही मग शेजारच्या तलावातून जवळच असलेल्या लहानशा विहिरीत गेली. याची माहिती मिळताच पंपाच्या सहाय्याने यातील पाणी उपसण्यात आले. त्यानंतर या मगरीला ताब्यात घेण्यात आले. यादरम्यान या विहिरीतून काही परदेशी कासव आणि मासेही बाहेर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे शोभेचे प्राणी म्हणून आणले जाणारे प्राणी पुढे सांभाळण्यास त्रासदायक ठरत असल्याने ते जंगलात सोडले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
