बदलापूरः मुरबाड तालुक्यातील सरळगाव जवळील व्यापारी-मानवली परिसरातून वाट चुकलेल्या आणि भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचवलेल्या बिबट्याच्या एका नवजात पिल्लाची ७२ तासांच्या थरारक आणि अथक मोहिमेनंतर अखेर त्याच्या आईशी पुनर्भेट घडवून आणण्यात वनविभाग आणि ”रॉ” (RAWW) संस्थेला यश आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून केवळ अडीच तासांची झोप घेऊन वन कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत राबवलेली ही मोहीम बुधवारी रात्री उशिरा फत्ते झाली. वन्यजीवप्रेमींकडून या सर्व पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सोमवार, ८ जून रोजी सकाळी व्यापारी-मानवली येथील आदिवासी वाडी शेजारी असलेल्या झाडाझुडपांमध्ये स्थानिक नागरिकांना बिबट्याचे एक नवजात पिल्लू एकटेच आढळून आले. परिसरात असलेल्या भटक्या कुत्र्यांनी या पिल्लाचा सुगावा लागताच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखून तेथील काही आदिवासी तरुणांनी कुत्र्यांना हुसकावून लावले आणि पिल्लाला सुरक्षित बाहेर काढले.
सरपंच मुकणे आणि सजग नागरिक नरेश व्यापारी यांच्या सतर्कतेमुळे वनविभागाला तातडीने पाचारण करण्यात आले. वनविभागाने पिल्लू ताब्यात घेऊन थेट मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा येथील रॉ-अश्वमेध टीटीसी केंद्रात आणले. येथे ठाणे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड, पवन शर्मा आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पिल्लाची प्राथमिक पाहणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावण सिंग आणि डॉ. सूर्यराव यांच्या मार्गदर्शनाखाली बछड्याची वैद्यकीय तपासणी आणि योग्य ते उपचार दिले गेले.
पिल्लाला त्याच्या आईपासून जास्त काळ लांब ठेवणे धोक्याचे असल्याने, पहिल्याच रात्री पिल्लाची आणि मादी बिबटची भेट करण्याचे प्रयत्न सुरू केले. ठाणे वनविभागाचे उपवनसंरक्षक रेपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नरच्या माणिकडोह बिबट सुश्रुषा केंद्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून रात्री निश्चित केलेल्या ठिकाणी सुरक्षेची पूर्ण काळजी घेत बछड्याला ठेवण्यात आले. पहिल्या रात्री मादी बिबट तिथे आल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र केवळ परिस्थितीचा अंदाज घेऊन ती पिल्लाला न घेताच निघून गेली. परिसरात भटके कुत्रे, कोल्हे आणि तरसांचा वावर असल्याने वनविभागाने पहाटे उजाडण्यापूर्वीच पिल्लाला पुन्हा सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
दुसऱ्या दिवशी दिवसभर बछड्याची वैद्यकीय तपासणी, काळजी घेण्यात वेळ गेला. या मोहिमेची गोपनीयता राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. दुर्दैवाने, दुसऱ्या रात्री पाऊस आणि अन्य प्रतिकूल कारणांमुळे मादी बिबट्या परिसरात फिरकली नाही. मात्र, तिसऱ्या दिवशी ”रॉ” संस्थेच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजेच थर्मल कॅमेरे, अत्याधुनिक ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि साऊंड रेकॉर्डरचा वापर करण्यात आला. यामुळे वन कर्मचारी आणि मादी बिबट्या यांच्यामध्ये सुरक्षित अंतर राखणे सोपे झाले.
अखेर, तिसऱ्या रात्री मादी बिबट्या जास्त वेळ न लावता पिल्लू ठेवलेल्या सुरक्षित पिंजऱ्यासमोर आली. तिने अत्यंत काळजीपूर्वक आपल्या पिलाला बाहेर काढले, त्याची चाचपणी केली, त्याचे चालणे व्यवस्थित आहे की नाही हे पाहिले आणि सर्व काही आलबेल असल्याचे खात्री पटताच पिल्लाला तोंडात पकडून ती शांतपणे जंगलाच्या दिशेने निघून गेली. हा अद्भूत नजरा कॅमेऱ्यात कैद होताच गेल्या ७२ तासांपासून डोळ्याला डोळा न लावता काम करणाऱ्या वन कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर सुटकेचे हसू उमटले.
बछड्याची आईशी भेट यशस्वी झाली असली, तरी या पिल्ला आणि आईला अतिउत्साही छायाचित्रकार किंवा युट्युबर्सकडून कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे, अशी माहिती मुरबाड पूर्वचे वनक्षेत्रपाल महेश शिंदे यांनी दिली.
या अत्यंत संवेदनशील आणि आव्हानात्मक मोहिमेत सरळगावचे वनपरिमंडळ अधिकारी महेंद्र साबळे, वनरक्षक अल्पना घोलप, गजानन मुसळे, लखन रहाडे, दिंगबर शिंगोळे, वाहनचालक संदेश घोलप, वनमजूर अर्जुन फोडसे, देहरीचे वनपाल रवींद्र घुडे, शिरवलीचे वनरक्षक मिठू घोडके आणि वनमजूर धर्मा खुणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच ”रॉ” संस्थेचे स्वयंसेवक चिन्मय, महेश, राहुल, साहिल, अमन, जोखीम आणि मीत यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. यासोबतच ग्रामसेवक उबाळे आणि मुरबाड पश्चिमचे वनक्षेत्रपाल संजूदास राठोड यांची या मोहिमेला मोलाची साथ लाभली.
