Thane ACB Arrests Murbad Talathi Milind Shinde: मुरबाड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे स्वामित्वधन (रॉयल्टी) व दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ५५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी व पोलीस पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली.

तलाठी मिलिंद शिंदे व पोलीस पाटील कुंडलिक दमाने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शिंदे यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली, तर दमाने यांनी त्यासाठी मध्यस्थी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तक्रारदार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. २७ एप्रिल रोजी पोलीस पाटील कुंडलिक दमाने यांनी तक्रारदार यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून माती ठेवलेल्या ठिकाणी बोलावले. तसेच, तलाठी मिलिंद शिंदे हे त्या ठिकाणी पंचनामा करत असल्याचे सांगितले.

त्यानुसार तक्रारदार घटनास्थळी गेले असता शिंदे यांनी पंचनामा पूर्ण केला. त्यानंतर २८ एप्रिल रोजी शिंदे यांनी तक्रारदार यांना कार्यालयात बोलावले. त्यावेळी स्वामित्वधन भरले नसल्याचे सांगून संबंधित तक्रार तहसीलदारांकडे गेली असून त्याचा अहवाल सादर करायचा असल्याचे त्यांनी सांगितले. अहवालानुसार ६०० ब्रास मातीसाठी दंडासह दीड ते दोन लाख रुपये भरावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. ही रक्कम कमी करून देण्यासाठी ५० हजार रुपये द्यावे लागतील, असे शिंदे तक्रारदार यांना म्हणाले.

या प्रकरणी तक्रारदार यांनी ५ मे रोजी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ६ मे रोजी तलाठी शिंदे यांनी तक्रारदार यांना पोलीस पाटील कुंडलिक दमाने यांच्या निवासस्थानी बोलावले. वीटभट्टी सुरू ठेवण्यासाठी आणखी पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे स्वामित्वधनाची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजार व वीटभट्टी सुरू ठेवण्यासाठी पाच हजार, अशी एकूण ५५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी शिंदे यांनी लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. तसेच, पोलीस पाटील दमाने यांनी मध्यस्थी करून लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहित केल्याचेही तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तलाठी मिलिंद शिंदे आणि पोलीस पाटील कुंडलिक दमाने या दोघांना अटक करण्यात आली आहे.