बदलापूरः पावसाने जून महिन्यात ओढ दिल्याने सुरू असलेला आदिवासींचा पाण्यासाठीचा संघर्ष, रानभाज्यांची कमतरता यामुळे जूनच्या शेवटच्या रविवारी होणारी हिरव्या देवाची यात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. मात्र गेल्या आठवडाभरापासून झालेल्या दमदार पावसामुळे उगवलेल्या रानभाज्या आणि पाण्याची उपलब्धता यामुळे हिरव्या देवाची यात्रा पुन्हा आयोजीत करण्यात आली आहे. येत्या रविवार, ५ जुलै रोजी मुरबाडमधील मासले बेलपाडा येथील अश्वमेध भवन येथे ही यात्रा संपन्न होईल.
पर्यावरण आणि आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अश्वमेध प्रतिष्ठान, श्रमिक मुक्ती संघटना, वन निकेतन, इनटॅच ठाणे यांच्या वतीने दरवर्षी जूनच्या महिन्यात दोन हिरव्या देवाच्या यात्रा आयोजीत केल्या जातात. यंदा नाणेघाट्या पायथ्याशी पहिली हिरव्या देवाची यात्रा पर्यावरण दिनी पार पडली. मात्र त्यानंतर वाढलेली उष्णता, पावसाचा अभाव यामुळे हिरव्या देवाची यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. मुरबाडच्या मासले बेलपाडा येथे दुसरी हिरव्या देवाची यात्रा आयोजीत केली जाते. मात्र रानभाज्यांची अनुपलब्धता, आदिवासींची पाण्यासाठी सुरू असलेली धावाधाव यामुळे ही यात्रा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचे दमदार आगमन झाल्याने येत्या रविवार, ५ जुलै रोजी ही यात्रा आयोजीत करण्यात आली आहे.
निसर्गाशी आपण काही देणे लागतो, त्यामुळे निसर्ग, निसर्ग राखणारे आदिवासी बांधव, त्यांच्या कलाकृती, रानभाज्या, त्याचे महत्व, त्यांच्या पाककृती, आदिवासींच्या स्पर्धा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे माध्यम म्हणून या यात्रांकडे पाहिले जाते. या यात्रांच्या माध्यमातून आदिवासी, पर्यावरण यांच्या सहवातास राहू इच्छिणारे पर्यावरणप्रेमी मुरबाडकडे धाव घेत असतात. यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदु असणारी रानभाजी स्पर्धा संपन्न होणार आहे. तर निसर्ग रांगोळी स्पर्धाही आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती अश्वमेध प्रतिष्ठानच्या अविनाश हरड यांनी दिली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून ८१०८२०८९३४ आणि ९७५७४१३८८१ या क्रमांकावर नोंदणी करून मोठ्या संख्येने हिरव्या देवाच्या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यंदा दोन नव्या उपक्रमांना सुरूवात
या हिरव्या देवाच्या यात्रेच्या निमित्ताने रूग्णोपयोगी साहित्य पेढी हा नवा उपक्रम सुरू केला जाणार आहे. आदिवासी आणि दुर्गम भागातील रूग्णांना अनेकदा हे साहित्य घेणे परवडत नाही. त्यामुळे विविध रूग्णोपयोगी साहित्य देण्याचा हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. तसेच आदिवासी बांधवांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन देण्यासाठीही कायदेशीर मदत केंद्राची सुरूवात रविवारी केली जाणार आहे. यावेळी मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख प्रमुख पाहुणे असतील.
