बदलापूरः ‘आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष २०२६’ आणि जागतिक महिला अधिकार दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील चासोळे येथील श्री क्षेत्र हटकेश्वर मंदिर परिसरात ‘शेतकरी महिला हक्क मेळावा’ आयोजीत करण्यात आला होता. ग्रामीण भागातील शेतकरी महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्या मागण्यांचा जाहीरनामा तयार करण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात काळू धरणाच्या बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या महिलांनी मोठी हजेरी लावली. तसेच काळू धरणाविरूद्ध शेवटपर्यंत लढा देण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी केला.

मुरबाड तालुक्यातील चासोळे हे गाव काळू धरणाच्या बुडीत क्षेत्रात आहे. श्रमिक मुक्ती संघटना, ठाणे आणि वन निकेतन संस्था, मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच काळू धरण प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील सर्व ग्रामसभांच्या सहकार्याने हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी, शेतमजूर आणि वनपट्टाधारक महिला सहभागी झाल्या. महिलांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या विविध सामाजिक, आर्थिक आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. मेळाव्यात प्रस्तावित काळू धरण प्रकल्पाचा महिलांच्या जीवनावर होणारा संभाव्य परिणाम हा प्रमुख चर्चेचा विषय होता.

धरणामुळे विस्थापन, उपजीविकेवर होणारा परिणाम आणि महिलांच्या दैनंदिन आयुष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी यावर महिलांनी आपले अनुभव मांडले. यावेळी बाई मी धरण बांधते, या कवितेचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी अनेक महिलांना अश्रु अनावर झाले. काळू धरणाच्या उभारणीविरूद्ध या गावांमध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेवटपर्यंत लढा द्यायचा, असा निर्धार यावेळी महिलांनी केला. त्यामुळे काळू धरणविरूद्ध आंदोलनात आता महिलांचा सक्रीय सहभाग दिसण्याची शक्यता आहे.

याशिवाय घरगुती आणि गावपातळीवरील विविध समस्या, पाणी टंचाई आणि त्याचा महिलांवर होणारा परिणाम, सरकारी आरोग्य सेवेतील अडचणी, मुलींच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्न तसेच शेतीमजुरीसाठी बाहेरगावी स्थलांतर करणाऱ्या महिलांच्या समस्या या विषयांवरही चर्चा झाली. मेळाव्यात उपस्थित महिलांनी आपापल्या अडचणी मांडत शासनाने महिलांसाठी ठोस धोरणे राबवावीत, अशी मागणी केली. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांच्या मागण्या आणि सूचना नोंदवून त्यावर आधारित जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महिलांसाठी अनोख्या स्पर्धा

या मेळाव्यात महिलांसाठी नाच करत गोफ विणण्याची आणि झाडांची पाने ओळखण्याची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यात महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नंदाताई उघडा, श्रमिक मुक्ती संधटनेच्या ऍड.इंदवी तुळपुळे, साधनाताई वैराळे, ऍड. दिव्या ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.