Raju Patil dog rocky fights leopard in murbad CCTV Video: मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्या मुरबाड येथील फार्म हाऊसवर त्यांच्या ‘रॉकी’ या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून समाेर आले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्याला रॉकीनेही तितक्याच धाडसाने प्रतिकार करत बिबट्यालाच जंगलाच्या दिशेने पळवून लावले. या थरारक झटापटीत रॉकी जखमी झाला असून त्याच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले.
मनसेचे नेते राजू पाटील यांचे मुरबाड येथे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर सोमवारी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कंपाऊंडच्या जाळीवरून उडी मारून आलेल्या बिबट्याने रॉकीवर हल्ला केला. हल्ला होताच रॉकीने क्षणाचाही विलंब न करता बिबट्यावर प्रतिहल्ला केला. रॉकीने बिबट्याच्या चावा घेतल्याने बिबट्याने स्वतःची सुटका करण्यासाठी धडपड सुरू केली.
अखेर रॉकीने पकड सैल करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले. या झटापटीत बिबट्याची नखे लागल्याने रॉकीच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत. राजू पाटील यांनी रात्रीच डॉक्टरांना बोलावून रॉकीवर प्रथमोपचार करून घेतले. सध्या रॉकीची प्रकृती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
राजू पाटील यांनी या घटनेची माहिती समाज माध्यमावरून देताना रॉकीच्या धाडसाचे कौतुक केले. तसेच, मुरबाड वनविभागालाही घटनेची तातडीने माहिती देण्यात आली असून वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
‘निसर्गाचा समतोल राखायला हवा’
रॉकीने शौर्याने बिबट्याला पळवून लावले, पण उद्या तिथे एखादा निष्पाप माणूस, महिला किंवा लहान मूलही असू शकते, याला जबाबदार कोण ? वन्यजीवांवर रागवण्यापेक्षा आपण निसर्गाचा समतोल राखायला हवा, अन्यथा हे संकट प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हा धोका मानव व अर्थातच सरकारच्या विकासाच्या नावावर उद्योगपती धार्जिण्या चुकीच्या योजनांना पाठबळ देण्यामुळे निर्माण झाला आहे हे मान्य करावेच लागेल. असे मत राजू पाटील यांनी पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.
