बदलापूरः आदिवासी महिलांनी जंगलातून शोधून, निवडून आणलेल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने शिजवलेल्या रानभाज्यांची पाककला समजून घेण्याची संधी मुरबाडच्या मासले बेलपाडा येथे आयोजीत हिरव्या देवाच्या यात्रेच्या निमित्ताने पर्यावरणप्रेमींना मिळाली. दरवर्षी आयोजीत केली जाणारी ही यात्रा इतिहास, परंपरा, खाद्यसंस्कृती, आदिवासींचे जीवन जवळून पाहण्याची संधी देत असते. यंदाही मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांतून अनेक पर्यावरणप्रेमींनी भर पावसातही मासले बेलपाडा येथील हिरव्या देवाच्या यात्रेत सहभाग नोंदवला.

पर्यावरण संवर्धनासह आदिवासींच्या हितांसाठी, वन्यजीव प्राणी, पक्षांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुरबाड तालुक्यात दोनदा हिरव्या देवाची यात्रा आयोजीत केली जाते. अश्वमेध प्रतिष्ठान, श्रमिक मुक्ती संघटना, वन निकेतन, इनटॅच ठाणे यांच्या वतीने रविवारी दुसऱ्या हिरव्या देवाच्या यात्रेचे आयोजन मुरबाड तालुक्यातील मासले बेलपाडा येथे करण्यात आले होते. हिरव्या देवाची यात्रा आदिवासी मंडळी आणि सहभागी होणारा नागरी समाज या सर्वांसाठी कायम नवीन दृष्टिकोन आणि उमेद देणारा असतो.

दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी महिलांनी जंगलातून शोधून, निवडून आणलेल्या रानभाज्या पाहुण्यांसमोर सादर केल्या. त्यांचे औषधी गुण, या भाज्या गोळा करण्याची योग्य वेळ, शिजवण्यापूर्वी घ्यावयाची काळजी , शिजवताना वापरले जाणारे इतर घटक आणि सर्वात मुख्य म्हणजे अत्यंत कमी तेलाचा वापर करूनही अत्यंत रुचकर आणि चवीष्ठ भाजी कशी बनवावी हे आदिवासी महिलांना शहरी पाहुण्यांना दाखवून दिले.

सध्या रानभाजी उत्सव साजरा होताना रानभाज्या म्हणजे शुद्ध शाकाहारी भाज्या अशीच एक ओळख सर्वांपुढे असते. मात्र आदिवासी संस्कृतीमध्ये या रानभाज्या मांसाहारी पदार्थ बरोबर शिजवून त्यांची पौष्टिकता वाढवण्याचा पारंपरिक प्रयोग या कार्यक्रमात करण्याची मुभा होती. त्यानुसार काही महिलांनी मांसाहारी पाककृतीही येथे ठेवल्या होत्या. त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अश्वमेध प्रतिष्ठानच्या कायदेविषयक सल्ला आणि मदत केंद्राचे औपचारिक उद्घाटन मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या परिसरातील आदिवासी व्यक्तींच्या आधारकार्डतील चुका सुधारण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करणार असल्याची घोषणा यानिमित्ताने तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी केली. तसेच मुरबाड तालुक्यातील

ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना आवश्यक असणारे व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर, बेड पेन असे आरोग्य साहित्य नाममात्र दराने उपलब्ध व्हावे यासाठी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या सहाय्याने रुग्णपयोगी साहित्यपेढीची सुरुवात यावेळी करण्यात आली. क्लबचे अध्यक्ष मोरे, कैलास देशपांडे यावेळी उपस्थित होते. सध्या या उपक्रमांतर्गत सात वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याच्या एकूण पन्नास वस्तू उपलब्ध झालेल्या आहेत. यावेळी इंदवी तुळपुळे, अविनाश हरड, दिव्या ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संग्रहालयाचे आकर्षण हिरव्या देवाच्या यात्रेनिमित्त येथे असलेल्या अश्वमेध प्रतिष्ठानच्या संस्कृती संग्रहालयाला भेट देण्याची संधी उपस्थितांना मिळाली. मुरबाडसह ठाणे जिल्ह्यातील विविध वस्तूंचा संग्रह येथे करण्यात आला आहे. या वस्तूंच्या माध्यमातून तत्कालीन इतिहास, गावगाडा, जीवनपद्धती समजून घेण्याची संधी मिळते.