अंबरनाथः मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे. त्यांनी माझी सुपारी एजाज लकडावाला याला दिली. त्या लकडावालाने स्वतः पत्र लिहून ही माहिती ठाणे पोलीस आयुक्तांना दिली आहे, असा खळबळजनक दावा बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांनी केला आहे.

अंबरनाथमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा दावा केला. स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पनवेलकर यांनी पोलिसांनाच आम्हाला आता न्याय द्या, असे आवाहन केले आहे. आमदार किसन कथोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून यापूर्वीच त्यांच्यावर शंभर कोटींचा बदनामीचा खटला दाखल केला आहे, आणखी एक दाखल केला जाईल असे सांगितले.

सोमवारी एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीचा संदर्भ देत आत अंबरनाथमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. बदलापूर पोलीस ठाण्यात गेलो असता पोलिसांनी एजाज लकडावाला नावाच्या गुंडाच्या पत्राचा संदर्भ देत चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितल्याची माहिती पनवेलकर यांनी दिली. आम्ही वारंवार आमच्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगतो आहे.

आता तर थेट पोलिसांनाच गुंड पत्र पाठवून आपल्याला सुपारी दिल्याचे सांगतात. मात्र तरीही आम्हाला पोलीस संरक्षण दिले जात नाही. आमच्या जागी राजकीय पुढारी असते तर त्यांना झेड दर्जाची सुरक्षा मिळाली असती, अशीही खंत यावेळी पनवेलकर यांनी बोलून दाखवली.

आम्ही आता हवालदील झालो आहोत. पोलिसांवर राजकीय दबाव आहे. आम्ही घराबाहेर निघू शकत नाही. आमचे उद्योग डबघाईला आले आहेत. यापूर्वी घरावर गोळीबार झाला आहे. यात आमदार किसन कथोरे हेच प्रमुख आहेत असा आमचा आरोप आहे, असेही पनवेलकर म्हणाले. आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सहकार्य करतात पण स्थानिक पोलीस वरिष्ठांची दिशाभूल करतात. गुंड स्वतः पत्र लिहून देतो मात्र तरीही पोलिस आरोपीचा जबाब घेत नाही, असेही पनवेलकर म्हणाले.

तर याबाबत आमदार किसन कथोरे यांना विचारले असता विश्वनाथ पनवेलकर हे स्वतः गुंड असून खदान माफिया म्हणून त्याची ओळख आहे. तसेच एजाज लकडावाला याचे आपण नावही ऐकले नसून त्याच्याशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. मात्र वारंवार माझ्या नावाची बदनामी केली जाते आहे. यापूर्वी ही विश्वनाथ पनवेलकर यांच्या विरोधात १०० कोटीच्या मानहानीचा खटला दाखल केला असून या आरोपानंतरही पनवेलकर विरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले.