बदलापूर: मुरबाड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किसन कथोरे यांचे व्हॉट्सॲप अकाउंट सायबर हॅकर्सनी हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आमदार कथोरे यांनी स्वतः यासंदर्भात अधिकृत माहिती देत जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये खळबळबळ उडाली असून सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, आता त्यांनी थेट लोकप्रतिनिधींनाच आपले लक्ष्य बनवण्यास सुरुवात केली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांचा ९४ ने सुरू होणारा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक हॅकर्सनी अज्ञात तांत्रिक मार्गाचा अवलंब करून आपल्या ताब्यात घेतला.
हे अकाउंट हॅक केल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी आमदार कथोरे यांच्या नावाचा गैरवापर करत त्यांच्या व्हॉट्सॲप संपर्कातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, कार्यकर्ते आणि परिचितांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. या मेसेजच्या माध्यमातून हॅकर्सकडून वेगवेगळ्या कारणांचे दाखले देत तातडीने पैशांची मागणी केली जात असल्याचे उघडकीस आले. ही बाब आमदार किसन कथोरे यांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पावले उचलली.
या गंभीर सायबर हल्ल्यानंतर आमदार किसन कथोरे यांनी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे एक महत्त्वाची आणि सतर्कतेची सूचना प्रसारीत केली आहे. माझा व्हॉट्सॲप नंबर हॅकर्सनी हॅक केला असून त्यावरून पैशांची मागणी केली जात आहे, तरी कृपया माझ्या या क्रमांकावरून आलेल्या कोणत्याही मेसेजला कोणीही रिप्लाय देऊ नये किंवा कुठलेही पैशांचे व्यवहार करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तसेच, काही शंका किंवा आपत्कालीन परिस्थिती वाटल्यास नागरिकांनी थेट पर्यायी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही आमिषाला किंवा अशा फसव्या मेसेजला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडूनही करण्यात येत आहे.
प्रतिक्रियाः या प्रकाराची माहिती मिळताच नागरिकांना मी सतर्क केले. माझ्या क्रमांकावरून ५० ते ५५ हजार रूपये मागितले जात आहेत. कुणीही मागणी केली तर पैसे देऊ नका. असे मेसेज किंवा फोन आल्यास माझ्याकडे पाठवा. मी सायबर पोलिसांत तक्रार केली आहे त्यात हे समाविष्ट करणार. – किसन कथोरे, आमदार, मुरबाड.
