बदलापूरः निसर्गाशी असलेले मानवाचे कृतज्ञतेचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी हा नैसर्गिक ठेवा जपण्याच्या उद्देशाने, ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील नाणेघाट फाटा येथील भूमाता वन धन केंद्रात येथे १३ वी हिरव्या देवाची यात्रा उत्साहात पार पडली. श्रमिक मुक्ती संघटना, वन निकेतन, अश्वमेध प्रतिष्ठान आणि ‘इन्टॅक’ (INTACH) ठाणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या यात्रेत ४५ अंश सेल्सिअसच्या कडक उन्हाची व तापमानाची तमा न बाळगता शेकडो निसर्गप्रेमी आणि आदिवासी बांधवांनी मोठी गर्दी केली होती.
आदिवासी-जंगलवासीयांच्या पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडवणाऱ्या ‘निसर्ग संवादी संस्कृती संग्रहालयाचे’ उद्घाटन या यात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण ठरले. दिवंगत डॉ.विजय साठ्ये यांच्या स्मृतीप्रत्यर्थ आणि त्यांच्या आर्थिक सहकार्यातून हे वैशिष्ट्यपूर्ण संग्रहालय साकारण्यात आले आहे. बांबूच्या सुंदर जाळीमध्ये उभारलेल्या या संग्रहालयात आदिवासी बांधवांच्या अत्यंत मर्यादित साहित्यातील समृद्ध जगण्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. या संग्रहालयात शिकार, मासेमारी आणि शेतीची पारंपरिक अवजारे मांडण्यात आली आहेत.
वनस्पती व झाडांच्या डिंकाचा वापर करून पक्षी पकडण्यासाठी तयार केलेला सापळा, तसेच लाकूड, बांबू, माती आणि धातूपासून बनवलेल्या विविध उपयोगी वस्तू येथे जतन करण्यात आल्या आहेत. जमीन सपाटीकरणासाठी पूर्वजांनी वापरलेल्या पेटारी , पावसापासून संरक्षणासाठी लागणारे पारंपरिक ‘इरले’, ठाकूर समाजाची देवाची ढोलकी, दोर बनवण्याचे साहित्य, आकोटी (कोयता ठेवण्याचे साधन), मातीची खापरी, रांजण, चूल, लाकडी पराती / काथवट आणि डाव अशा अनेक दुर्मिळ पर्यावरणपूरक वस्तूंचे जतन येथे करण्यात आले आहे. या केंद्रात लवकरच वीजपुरवठा सुरू होणार असून, या दुर्गम भागातील नागरिकांसाठी महिन्यातून दोन दिवस चालणारे पहिले कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत केंद्र (वकील केंद्र) येथे सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
विविध स्पर्धा आणि बक्षीस वितरण
पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यात रानभाजी पाककृती स्पर्धेत शिरसोनवाडीने २२ प्रकारच्या रानभााज्या बनवून प्रथम क्रमांक पटकावला. पावसाच्या सुरुवातीला जंगलात मिळणाऱ्या औषधी व पोषक रानभाज्यांचे पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. तर कृत्रिम व रासायनिक रंगांना फाटा देत केवळ पाने, फुले आणि फळांचा वापर करून आकर्षक रांगोळ्या या स्पर्धेत साकारण्यात आल्या.
डोंगराच्या पायथ्याशी राहून केलेली शेती अनेकदा आव्हानात्मक मानली जाते. मात्र, आदिवासी शेतकऱ्यांनी वनहक्काच्या जमिनीवर निसर्गाशी संलग्न राहून भात, फळबागा आणि वनौषधींची लागवड करून घेतलेल्या कष्टाचे चीज केले. ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ मध्ये घोषित केलेल्या या स्पर्धेत १६ शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला आणि नागरिकांना लिंबू व इतर फळझाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी इंदवी तुळपुळे, लक्ष्मण वाघ, प्रभाकर देशमुख , अविनाश हरड, प्रणिता हरड, दशरथ वाघ, दिव्या ठाकूर आणि सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी मुरबाडचे तहसिलदार अभिजीत देशमुख, वनक्षेत्रपाल माधव डफडे,सुजय कोळी, निवृत्त वनाधिकारी अजय पिलारीसेठ, चंद्रकांत शेळके, विविध वनअधिकारी, कर्मचारी, आदिवासी बांधव आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
