डोंबिवली : मुरबाड तालुक्यातील सासणे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत डोंबिवली महिला महासंघातर्फे जनजागृती व्याख्यान व उपक्रमाचे आयोजन केले होते. ४०० विद्यार्थी, शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. आदिवासी, डोंगर दुर्गम भागातील विद्यार्थी शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत असतात. त्यांना सामाजिक भानाचा विचार करून चालू घडामोडींची माहिती द्यावी, जागृत करावे या उद्देशाने या जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते.

या उपक्रमाच्या आयोजनासाठी मुरबाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी पुढाकार घेतला. पोलीस विभागाच्या मागणीवरून डोंबिवली महिला महासंघाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण घेत असताना आपल्या आजुबाजुची स्थिती, घडणाऱ्या घटना, सामान्य कायदे ज्ञान याची माहिती असावी असा विचार केला व मुरबाड तालुक्यातील सासणे आश्रम शाळेत जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी विद्यार्थ्यांना बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात आली. या कायद्याने अल्पवयीन पीडित मुलीचे संरक्षण, गुन्हा करणाऱ्या आरोपीला कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते याची जाणीव करून देण्यात आली. असा काही प्रकार घडत असेल तर तात्काळ आपल्या घरात, शिक्षक, मुख्याध्यापक, पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

बालविवाह आणि त्याचे धोके विद्यार्थ्यांना पटवून सांगण्यात आले. बालमजुरी प्रतिबंधक कायद्याने अल्पवयीन मुलांना कोणत्या प्रकारचे संरक्षण आणि कायद्याने कशी शिक्षा होऊ शकते या संदर्भात जनजागृतीपर व्याख्याने यावेळी देण्यात आली.

डोंबिवली महिला महासंघाच्या अध्यक्षा डॉ. प्रा. विंदा भुस्कुटे, महासंघाच्या संस्थापक अध्यक्षा व कार्यवाहक ज्येष्ठ सनदी लेखापाल जयश्री कर्वे, महासंघाच्या सदस्या ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका सई बने यांची यावेळी मार्गदर्शनपर भाषणे झाले. यावेळी सुमारे ४०० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सासणे माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक हेमंत निमसे, धीरज चौधरी, निलेश शेंडे, सुरेखा चव्हाण, ज्योती देशमुख, प्रकाश खरपडे, स्वप्निल हरणे, उमेश शेळके, दिनेश बिराडे, स्वाती तराळे, सुचिता हरड, गीता गायकवाड सहभागी झाले होते.

मुरबाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक हिंदुराव यावेळी उपस्थित होते. रामदास काळे, जया काळे, दीप्ती कंटे यांनी डोंबिवली महिला महासंघाच्या या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महत्वाचे सहकार्य केले.