कल्याण : गुरूवारी संध्याकाळी मुरबाड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा मुसळधार अवकाळी पाऊस पडला. पावसाळ्यापूर्वीची कामे करण्यात गर्क असलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक जोर असलेल्या भागातील घरांची छते उडून गेली. काही कौलारू घरे कोसळली. घरातील रहिवाशांनी वेळीच घरातून बाहेर पडणे पसंंत केल्याने जीवित हानी टळली.

राज्याच्या अनेक भागात गुरूवारी संध्याकाळी अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याला या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. मुरबाड तालुक्यातील आदिवासी, डोंगर भागातील साखरवाडी भागाला या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला. या वाडीतील अनेक घरांवरील पत्र्याची छते वादळी वाऱ्याने उडून गेली. अचानक घरात पावसाच्या धारा आणि गारांचा शिडकावा सुरू झाल्यावर घरातील सदस्यांची पळापळ झाली.

या वादळी वाऱ्याने घर कोसळते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे काही कुटुंबांनी शेजाऱ्याच्या घराचा आश्रय घेतला. ग्रामीण, आदिवासी डोंगर भागात पावसाळ्यापूर्वीची लाकूड फाटा जमा करणे, मोहाची फुले जमा करणे, पळसाची पाने वाळवून ठेवणे, शेतांची बांधबंदिस्तीची कामे सुरू आहेत. काहींनी शेतामधील आपला वाल, हरभरा काढून शेतात ठेवला आहे.

गुरुवारी संध्याकाळी अचानक वादळी वारे सुरू झाले. मोठ्या प्रमाणात धुळीचे लूट सर्वदूर पसरले. काही क्षणात त्याच्या पाठोपाठ वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू झाला.

या पावसाबरोबर गारांही पडल्या. गारा वेचण्यासाठी लहान मुलांची भर पावसात तारांबळ उडाली. गारांचे फटके आणि अचानक वादळी वारा सुरू झाल्याने जंगलात चरायला गेलेली गाई, बैल, म्हशी घराच्या दिशेने पळत सुटली. वादळी वाऱ्यामुळे झाडावरील आंबे गळून पडले. बागायतीमधील आंब्यांना या अवकाळीचा फटका बसला.

मुरबाड तालुक्यातील अनेक घरांचे या वादळी वाऱ्याने नुकसान केले आहे. त्यामुळे या घरांचे तातडीने पंचनामा स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी करावेत. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पुणे, अहिल्यानगर भागातून माळशेज घाटमार्गे कल्याणकडे येणाऱ्या अनेक प्रवाशांना या वादळी वाऱ्याने मुरबाड तालुक्यातील टोकावडे, माळशेज घाट परिसरात गाठले. समोरून धुळीचे लोट आणि त्यात जोराचा पाऊस असल्याने वाहनातील प्रवाशांची घाबरगुंडी वळली. अनेक वाहन चालकांनी रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करून काही वेळ एकाच जागी उभे राहणे पसंत केले. अर्धा तासानंतर पाऊस ओसरल्यानंतर तालुक्यातील व्यवहार पुन्हा सुरळीत झाले.