बदलापूर : पापड व मिरगुंड निर्मितीच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील शेकडो ग्रामीण महिलांना कायमस्वरूपी व सन्मानजनक रोजगार मिळवून देणाऱ्या रावगाव येथील प्रगत महिला गृह उद्योगाला मानाचा खादी ग्रामोद्योग भरारी पुरस्काराने गौरवण्यात आले. मुंबईतील राजभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या एका समारंभात राज्याचे राज्यपाल राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते संस्थेच्या प्रतिनिधी रक्षा रमेश वागे यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.

१५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची विशेष उपस्थिती होती. राज्यपालांनी ग्रामीण उद्योजकतेला व महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. मुरबाड तालुक्यातील रावगावचे रहिवासी व पेशाने शिक्षक असलेल्या रमेश वागे यांनी बदलापूर शिक्षकी पेशा सोडून २०१७ मध्ये सामाजिक कार्यात उडी घेतली.

ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या हक्काचे पैसे कमवता यावेत व कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा, या उदात्त हेतूने त्यांनी प्रगत महिला गृह उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला रावगाव, केदुर्ली, केदुर्ली पाडा या भागातील केवळ ४५ महिलांसह उडीद, नाचणी पापड, उडदाचे मिरगुंड व पोह्याचे पापड तयार करण्यास सुरुवात झाली.

संशोधन व विकासाच्या माध्यमातून उत्तम चव व दर्जा राखत त्यांनी समृद्ध पापड या नावाने आपले उत्पादन बाजारात आणले. किफायतशीर दर, उत्तम दर्जा व तत्पर सेवा यामुळे अवघ्या काही वर्षांतच मुरबाड, शहापूर, कर्जत, अंबरनाथ व बदलापूर येथील २०० हून अधिक दुकानदार व व्यापाऱ्यांकडून समृद्ध पापडला मोठी मागणी येऊ लागली.

करोनाच्या कठीण काळातही या उद्योगाने महिलांना मोठा आधार दिला. आजघडीला अनेक गावांतील शेकडो महिला या उद्योगाशी जोडल्या गेल्या आहेत. वर्षभरात केवळ १५ दिवस शेतीच्या कामांसाठी सुट्टी वगळता ११ महिने हा उद्योग अविरत सुरू असतो. घरबसल्या पापड लाटून या महिला महिन्याला अडीच ते पंधरा हजार रुपयांपर्यंतचे हक्काचे उत्पन्न मिळवत आहेत.

कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या वा मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अनेक महिलांसाठी हा गृह उद्योग मोठा आर्थिक आधार बनला आहे. या पुरस्कारामुळे संस्थेच्या व त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या शेकडो महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली असून, ग्रामीण उद्योजकतेसाठी हा एक मोठा प्रेरणादायी क्षण ठरला आहे.