Murbad Prasad Khapare Appointed Assistant Commander in Indian Army: मुरबाड तालुक्यातील खेडले तळवली येथील तरूण प्रसाद हरिश्चंद्र खापरे याची भारतीय सैन्य दलात साहाय्यक कमांडर वर्ग १ म्हणू नियुक्ती झाली आहे. मुरबाड तालुक्यातील एक तरूण भारतीय सैन्य दलात देशसेवेसाठी सहभागी झाल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातून गेल्या दोन वर्षात भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे प्रमाण वाढत आहे.
प्रसाद खापरे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून कॅफ परीक्षा दिली होती. या परीक्षेतून मिळालेल्या यशातून प्रसादचा सैन्य दलात भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रसादचे मूळ गाव ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील खेडले तळवली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. अभ्यासात हुशार असल्याने त्याची निवड पालघर येथील नवोदय विद्यालयातील शिक्षणासाठी झाली. या विद्यालयात प्रसादने इयत्ता सहावी ते नववीपर्यंत शिक्षण घेतले. दहावी, बारावीच्या शिक्षणानंतर त्याने जेईई परीक्षेत ९८ टक्के गुण मिळवले. त्याने त्यानंतर बॅचलर ऑफ टेक्नाॅलाॅजीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
शालेय जीवनापासून प्रसादला सैन्य दलात भरती होण्याची तीव्र इच्छा होती. लष्करी गणवेशाची त्याला विशेष आवड होती. त्यामुळे शालेय जीवनापासून तो नियमित व्यायाम, सकाळी उठून धावणे, सदृढ शरीरासाठी काळजी घेत असे. मागील दहा वर्षापासून त्याची ही अथक मेहनत सुरू होती. काही वेळा अपयश आले, पण त्यात हार न मानता ती यशाची पायरी समजून त्याने सैन्य दलातील भरतीसाठी दिलेली परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत कॅप परीक्षेत पहिल्या १०० जणांच्या यादीत प्रसादने स्थान मिळवले.
प्रसादचे वडील मुरबाड तालुक्यातील जनसेवा शिक्षण मंडळात शिक्षक होते. मुलाची सैन्य दलात जाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याला काही कमी पडू दिले नाही. त्याला शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आवश्यक ते साहाय्यक मिळेल यासाठी प्रयत्न केले. स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने प्रसाद दिल्लीत निवास करत होता. यावेळी तो दिवसाचे मार्गदर्शन वर्ग सोडले तर उर्वरित वेळेत घरी रात्री २ वाजेपर्यंत अभ्यास करत असे. पुन्हा पहाटे चार वाजता उठुन अभ्यास करत होता, असे प्रसादचे वडील हरिश्चंद्र खापरे यांनी सांगितले.
मुलगा देशाच्या सीमेवर रक्षणासाठी जातोय याबद्दल समाधान आहेच, पण त्या बरोबर काळजीही वाटते, असे प्रसादची आई हर्षला यांनी भावुक होऊन सांगितले. ‘मराठी शाळेत शिक्षण घेऊनही जीवनाची पुढची यशस्वी वाटचाल करता येते. शालेय जीवनापासून लष्करात देशसेवेसाठी जाण्याची खूप इच्छा होती. यासाठी आवश्यक ती कठोर मेहनत घेतली. आई, वडील, कुटुंबीयांनी प्रसंगी मोलाची साथ दिली. येथील भूमातेचे ऋण फेडण्यासाठी सैन्य दलात दाखल होत आहे. येणाऱ्या तरूण पीढीनेही देशसेवेचे व्रत स्वीकारले पाहिजे,’. साहाय्यक कमांडर म्हणून यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रसाद आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी पदग्रहण करणार आहे. आमदार किसन कथोरे यांनी प्रसादच्या या यशाबद्दल मुरबाडची मान त्याच्या या पदस्थापनेमुळे उंचावली आहे. प्रसादने लष्करी सेवेत उत्तुंग कामगिरी करून वरिष्ठ मानाच्या पदावर पोहाचावे. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत, असे कौतुकोद्गगार काढले. माजी आमदार गोटीराम पवार, सुभाष पवार यांनीही प्रसादच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रसादचे कौतुक करण्यासाठी त्याच्या घरी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांची रांग लागली आहे.
