कल्याण – राज्यस्तरिय सुलेखन स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (दुर्गापूर) जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आणि कवी दामोदर पारधी यांनी सहाव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावून पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये येण्याचा मान मिळविला आहे. आदिवासी, दुर्गम भागात राहुन आपले अध्यापनाचे कर्तव्य पार पाडून पारधी यांनी हे यश संपादन केल्याने विविध स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे.
शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात भर घालणे, भाषिक अभिव्यक्ती आणि सादरीकरण क्षमतेला चालना देणे या उद्देशाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यावतीने सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात एकूण ४३ विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा केंद्र स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत घेण्यात आल्या. राज्याच्या विविध भागातील शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते. या स्पर्धांपैकी राज्यस्तरीय सुलेखन स्पर्धा गेल्या आठवड्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) सिंधुदुर्ग, नवघर वसाहत, गरुड सर्कलजवळ, ओरोस, जि. सिंधुदुर्ग येथे पार पडली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आठ विभागांतून निवड झालेल्या एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
आपल्या जिल्हा परिषद शाळेत विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देण्यात पुढाकार घेणारे हरहुन्नरी उपक्रमशील शिक्षक दामदोर पारधी यांनीही या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी, शाळेतील कर्तव्य पार पाडून त्यांनी स्पर्धेसाठीची आवश्यक तयार केली. राज्यस्तरीय निकालानुसार या स्पर्धेत शिक्षक, कवी दामोदर पारधी यांनी उत्कृष्ट कामगिरी करत टॉप १० मध्ये सहावा क्रमांक पटकावला. यापूर्वी मुंबई विभाग स्तरावर झालेल्या सुलेखन स्पर्धेत त्यांनी टॉप पाचमध्ये स्थान मिळवत राज्यस्तरासाठी आपली निवड निश्चित केली होती.
राज्यस्तरीय सुलेखन स्पर्धेत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे मुरबाड तालुक्यातील शिक्षक, शिक्षणप्रेमी व ग्रामस्थांकडून कवी पारधी यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. वाघवाडी सारख्या डोंंगराळ भागात राहून शिक्षक पारधी आपल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवितात. गावातील प्रत्येक मूल शाळेत आले पाहिजे. ते शिकले पाहिजे यासाठी त्यांचा ध्यास आहे. मुलांच्या बुध्दी कौशल्याप्रमाणे त्यांची कौशल्ये विकसित करण्यासाठी पारधी प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना यश मिळत आहे. पारधी यांच्या प्रयत्नांंना ग्रामस्थांकडून सहकार्य मिळत आहे.

