ठाणे : काही वर्षांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून माजी महापौर नरेश म्हस्के हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. परंतु या प्रवेशापासून त्यांना रोखून मातोश्रीवर नेऊन त्यांची समजूत काढली. ही माझी चूक होती, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुका लढा.. होऊन जाऊ दे एकदाचे समोरासमोर, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख पदावर ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु रवीवारी त्यांनी आपण बाळासाहेबांची शिवसेना पक्षात असल्याचे सांगितले. दरम्यान, खासदार राजन विचारे आणि भास्कर पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भास्कर पाटील हे आमच्याच पक्षात असल्याचा दावा केला. या परिषदेदरम्यान विचारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

हेही वाचा >>> “पक्षावर दबाव आणण्यासाठी कट…”, नरेश मस्केंचा राजन विचारेंवर गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काँग्रेस पक्षात होते, त्यावेळेस त्यांच्या उपस्थितीत नरेश म्हस्के हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे दिली होती. त्यानुसार त्यांना पक्षप्रवेशापासून रोखले आणि मातोश्रीवर घेऊन गेलो. तिथे उध्दव यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख आणि महापौर अशी पदे मिळाली. त्यामुळे ही माझी चूक होती, असे विचारे यांनी सांगितले.

हेही वाचा >>> फेब्रुवारीपासून मानखुर्द-ठाणे प्रवास केवळ पाच मिनिटांत

पोलिसांच्या खांद्यावर बंदुका ठेवून गोळ्या झाडण्याचे काम बंद करा, अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम केले पाहिजे. परंतु पोलीस यंत्रणा या राज्यकर्त्यांच्या दावणीला बांधल्याचे दिसत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ठाण्यात वर्चस्व असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे वर्चस्व असेल तर निवडणुका का घेत नाहीत. हिमंत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुका लढा…होऊन जाऊ दे एकदाचे समोरासमोर, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा >>> टिटवाळा रेल्वे फाटकावरील उड्डाण पूल जूनमध्ये खुला?, पुलाच्या पोहच रस्ते कामांना प्रारंभ

भास्कर पाटील हे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे विधानसभा क्षेत्र प्रमुख पदावर नियुक्ती झाली. त्यानंतर काही जणांनी त्यांना गाडीत बसवून नेले आणि त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर दबाब टाकण्यात आला असावा किंवा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविली गेली असेल. त्यामुळेच त्यांनी असे सांगितले असेल, असा दावा त्यांचे बंधु जंयत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. भास्कर पाटील हे पत्रकार परिषदेला हजर नव्हते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता, त्यावर त्यांच्या बंधूसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळू शकले नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My mistake naresh mhaske stopped from entering the congress party thackeray group rajan vikhare statement ysh
First published on: 17-01-2023 at 11:40 IST