Pratap Sarnaik Helps Nagesh Bhoir: वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून कोसळल्यामुळे नागेश भोईरच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. गेली १८ वर्षे त्याचे आयुष्य अंथरुणात असून आजही उपचारांचा खर्च सुरू आहे. ‘आर्थिक मदत नको, मी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी नागेशने सरकारकडे केली होती. यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे त्याच्या मदतीसाठी पुढे आले असून त्याचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

ठाणे आणि मुंबई शहरात लाखो रुपये रोख रक्कम बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. यात उंच थरार गोविंदा पथकांकडून रचण्यात येतात. या उंच थर दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो. मात्र, या साहसी खेळात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत आयुष्यभर मोजावी लागू शकते.

भिवंडीतील नागेश भोईर याच्या बाबतीत २००९ मध्ये असेच काही घडले होते. वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी दहीहंडीच्या थरावरून कोसळलेल्या नागेशच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर गेली १८ वर्षे तो अंथरुणात असून त्याच्यावर आजही उपचार सुरु आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे व पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगण्याचे त्याचे स्वप्न त्या एका अपघाताने हिरावून घेतले.

नागेशला नियमित उपचार, औषधे व फिजिओथेरपीची आवश्यकता असते. प्रकृतीनुसार दर दोन महिन्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपचारांचा खर्च कुटुंबासाठी मोठे आव्हान बनला आहे. सुरुवातीच्या काळात मित्र आणि परिचितांनी आर्थिक मदत केली. मात्र, कालांतराने मदतीचे प्रमाण कमी झाले. सध्या काही मोजके मित्र त्याच्या औषधोपचारासाठी मदत करीत आहेत. परंतु आता औषधोपचाराचा खर्च करणे अवघड झाल्याने त्याने सरकारकडे मदतीची मागणी केली होती. आर्थिक मदत नको, मी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतो, त्या उपचारांचा खर्च शासनाने उचलावा, अशी मागणी त्याने सरकारकडे केली होती. यानंतर परिवहन मंत्री मंत्री प्रताप सरनाईक हे त्याच्याशी मदतीसाठी पुढे आले आहेत. वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंद पथकांशी संवाद साधताना मंत्री सरनाईक यांनी नागेशचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे नागेशला आता मोठा दिलासा मिळाला आहे.