ठाणे : लैंगिक अत्याचार, खून आणि दरोड्यासारख्या अमानुष गुन्ह्यांनी महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या कुख्यात दुकलीला अखेर न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. ठाणे विशेष मोक्का न्यायालयाने या टोळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावताना, प्रत्येकी १५ लाख रुपयांप्रमाणे एकूण ३० लाख रुपयांचा दंडही सुनावला. विशेष म्हणजे, लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मोक्का कायद्यांतर्गत देशात पहिल्यांदाच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे या निकालाकडे ऐतिहासिक निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन साहाय्यक पोलीस आयुक्त आणि सध्याचे ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केला होता. तपासातील पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि आरोपींविरोधातील गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडण्यात आली. अखेर न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावत या प्रकरणाचा निकाल दिला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक इरफान नदाफ यांच्याकडे आला असता त्यांनी आरोपींवर १२ हून अधिक दरोड्याचे गंभीर गुन्हे असल्याचे उघडकीस आणले. त्यामुळे दोघांवरही संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का दाखल करून गुन्ह्याचा तपास तत्कालीन पंकज शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी सबळ पुराव्यांसह ठाणे विशेष मोक्का न्यायालयात आरोपीं विरोधात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर बुधवार मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी दोन्ही आरोपीला लैंगिक अत्याचार, दरोडाच्या गुन्ह्यात जन्म ठेप आणि ३० लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

प्रकरण असे

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील प्रगती नगरममध्ये राहणाऱ्या बांधकाम मजूराच्या घरात शिरुन मजूर आणि त्याच्या पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना १८ जानेवारी २०२२ मध्ये घडली होती. कुख्यात आरोपी मोनू रायडर ऊर्फ निशांत मनोज कुमार मिश्रा याने त्याचा साथीदार नीरज ओमप्रकाश राय याच्या मदतीने रात्री मजुराला घराचे दार उघडण्यास भाग पडून चाकूचा धाक दाखवत मजुराच्या पत्नीला मारहाण करून बलात्कार केला होता. त्यानंतर तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत घरातील तांदळाच्या डब्यात ठेवलेले एक हजार रुपये काढून घेतले होते. पीडित महिलेने ही बाब घरमालकीणीला सांगितल्यानंतर तुळींज पोलीस ठाण्यात दोघांना विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२)(एम)(एन), ३९४, ३६५, ३४२, ४५२, ३२३, ५०४, ५०६ सह कलम ३४अन्वये गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची साक्ष निर्णायक

या खटल्यात सध्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांच्या साक्षीमुळे खटल्याला निर्णायक बळ मिळाले. महासंचालक सदानंद दाते यांची साक्ष देखील न्यायालयात झाली. मोक्का न्यायालयाचे विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायालयात १३ साक्षीदार तपासून न्यायालयासमोर भक्कम साक्षी पुरावे सादर केले. लैंगिक अत्याचार मोक्काअंतर्गत या प्रकाराची शिक्षा लागण्याचा देशातील हा पहिलाच निकाल असल्याचा दावा केला जात आहे.