माळशेज, नाणेघाट बिबटय़ांचे जंगल

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या वेशीवर असणाऱ्या माळशेज आणि नाणेघाट या दोन प्राचीन मार्गालगत अजूनही घनदाट जंगल आहे.

ठाणे आणि पुणे जिल्ह्यांच्या वेशीवर असणाऱ्या माळशेज आणि नाणेघाट या दोन प्राचीन मार्गालगत अजूनही घनदाट जंगल आहे. प्रामुख्याने मुरबाड तालुक्यात मोडणारा हा प्रदेश पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील आहे. या जंगलात २० वर्षांपूर्वी एकही बिबळ्या नव्हता. मात्र आता परिसरातील जंगलात बिबळ्यांचा वावर वाढला आहे. १९९३मध्ये झालेल्या प्राणीगणनेत एकही बिबळ्या आढळून आला नव्हता. पण २०१३च्या प्राणीगणनेनुसार या भागात किमान चार ते पाच बिबटे आढळून आले आहे. येथील परिसरात असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी जंगल राखण्यासाठी मोठी मदत केल्यामुळेच येथे जंगलाचे अस्तित्व टिकून राहिले आणि बिबटय़ांचा वावर वाढला आहे.
गेली काही वर्षे संयुक्त वन व्यवस्थापन योजनेला स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या चांगल्या प्रतिसादामुळे या भागातील तब्बल २५ हजार हेक्टर क्षेत्रातील वनाचे उत्तम संवर्धन झाले असल्याची माहिती टोकवडे विभागाचे परीक्षेत्र वन अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी दिली. ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने राबविलेल्या या उपक्रमांची दखल घेऊन माळशेजच्या पायथ्याशी असलेल्या खेडले, पेंढरी आणि थितबी या गावांना सलग तीन वर्षे संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत दिला जाणारा उत्कृष्ट वनसंवर्धन पुरस्कारही मिळाला आहे. जंगलाचा परीघ विस्तारल्याने सहाजिकच वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळेच येथे बिबळ्यांच्या संख्येत वाढ झाली, अशी माहितीही त्यांनी दिली.
काँक्रिट बंधारे
वन विभागाने जंगल भागातील रहिवाशांच्या समस्या विचारात घेऊन विविध योजना राबविल्या आहेत. वन्यप्राणी शेतात घुसून पिकांचे नुकसान करतात, ही येथील ग्रामस्थांची प्रमुख तक्रार होती. उन्हाळ्यात जंगलातील जलस्रोत आटतात. त्यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे धाव घेतात, ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यासाठी त्यांनी जंगलातील जलस्रोतांचे संवर्धन व्हावे या हेतूने काँक्रिटचे बंधारे बांधले. त्यामुळे आता वन्यप्राणी शेतात येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, असे शेळके यांनी सांगितले.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने माळशेज आणि नाणेघाट परिसरात पर्यावरणीय पर्यटन योजना (इको टुरिझम) राबवली जात आहे. गेल्या दोन वर्षांत या योजनेअंतर्गत माळशेज घाटात कामे सुरू आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी वाहनतळांची सोय (पार्किंग) करण्यात आली आहे.

थितबी होणार पर्यटन ग्राम
माळशेजच्या पायथ्याशी असणारे थितबी गाव पर्यटन ग्राम म्हणून विकसित केले जाणार आहे. सध्या येथील काही भागात माथेरानप्रमाणे वाहनबंदी करण्यात आली आहे. या भागात परंपरागत आदिवासी जीवनशैलीचा अनुभव देणारी निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या पावसाळ्यात या भागात अनेक पर्यटक येतात. त्यामुळे स्थानिक आदिवासींना काही प्रमाणात रोजगार मिळतो. पर्यटनग्रामनंतर अधिक मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. मुरबाडच्या जंगलात अलीकडेच करण्यात आलेल्या प्राणीगणनेत बिबळे आढळले आहेत. याशिवाय या जंगलात कोल्हे, नीलगाय, ससे, रान डुक्कर, साळींदर, माकडे, रानडुक्कर, तरस आदी प्राणी आहेत. याशिवाय आंबा, जांभूळ, काजू, करवंद, आदी रानमेवा हे या जंगलाचे वैशिष्टय़ आहे. स्थानिक आदिवासींना या रानमेवा विकण्यासाठी  महामार्गालगत खास स्टॉल्स उभारून दिले जाणार आहेत.    
प्रशांत मोरे, ठाणे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Naneghat malshej forest of leopard

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या