ठाणे : नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा खाडी पूल परिसरात आगरी-कोळी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येतात. तसेच या भागात जत्रेचेही आयोजन करण्यात येते. त्यामुळे या परिसरात ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. हे बदल गुरुवारी दुपारी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. त्यामुळे ठाण्याहून नवी मुंबई, कळवा, मुंब्रा आणि विटावा येथे जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.

नारळी पौर्णिमेनिमित्त कळवा खाडी पूल परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे या भागात नागरिकांची मोठी गर्दी होते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. कळवा खाडी पुलावरून कोर्टनाक्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना उर्जिता उपाहारगृह परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

या मार्गावरील वाहने आरटीओ कार्यालय आणि जीपीओमार्गे वळविण्यात येतील. साकेत रस्त्यावरून सिडकोच्या दिशेने जाणाऱ्या टीएमटी आणि एनएमएमटीच्या बसगाड्यांना राबोडी वाहतूक कक्ष कार्यालयापुढे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे शहरातून कळवा खाडी पूल मार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसगाड्या, एसटी, टीएमटी आणि एनएमएमटीच्या बसगाड्यांना खोपट सिग्नल येथे प्रवेशबंदी असेल.

या वाहनांना पूर्व द्रुतगती महामार्गाने मुलुंड टोलनाका, ऐरोली पूल किंवा माजिवडा-खारेगाव मार्गे पुढे जाता येईल. गोल्डन डायज नाका येथून जीपीओमार्गे कळवा खाडी पुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना गोल्डन डायज नाका येथेच प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहने खारेगाव टोलनाका किंवा कोपरी, मुलुंड टोलनाका, ऐरोलीमार्गे पुढे जातील.

नवी मुंबईहून विटावा, कळवा व ठाणे शहराच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड, सहाचाकी वाहनांसह खासगी तसेच परिवहन सेवेच्या बसगाड्यांना पटणी परिसरात प्रवेशबंदी असेल. या वाहनांना ऐरोली खाडी पूल मार्गे पुढे जाता येईल. मुंब्रा व पारसिक नगर येथून कळवा, ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू वाहनांना तसेच बसगाड्यांना पारसिक चौक येथे प्रवेशबंदी असेल. या वाहनांना खारेगाव टोलनाका मार्गे वाहतूक करता येईल.