केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथील पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचं तापलं आहे. शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, नारायण राणेंच्या विधानावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, राज्यात महाविकासआघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही या वक्तव्याचा निषेध नोंदवला गेला. हा वाद काहीसा शांत झाला असला तरी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यामुळे शिवसैनिकांच्या चांगलच जिव्हारी आलं आहे. त्यामुळे कालच्या आंदोलनानंतर आता बॅनरबाजीतून शिवसेना राणेंवर हल्लाबोल करत आहेत.

ठाण्यात शिवसेनेचे बॅनर

ठाण्यात शिवसेनेने बॅनर लावत नारायण राणे यांना लक्ष केले आहे. “बरळत राहणे तुमचं काम आहे. जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे. आज, उद्या, कधीही… उद्धवजींसोबतच”, असे लिहीत बॅनरद्वारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. ठाण्यामधील तीन हातनाका येथील उड्डाणपुलावर शिवसनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.

Video : नारायण राणेंच्या अटकेचा अर्थ काय?; गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली होती. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकीय वातावरण तापले.

काय म्हणाले होते नारायण राणे?

भाजपतर्फे राज्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरू आहेत. त्यापैकी कोकण विभागाची यात्रा १९ ऑगस्टला मुंबईहून सुरू झाली. सोमवारी ती महाडमध्ये आली असता तेथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाचा संदर्भ दिला. ‘‘यंदाचा स्वातंत्र्यदिन हीरक महोत्सव की अमृत महोत्सव, अशी मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली तेव्हा मी त्या ठिकाणी असतो, तर कानाखाली चढवली असती’’, असे आक्षेपार्ह विधान राणे यांनी केले. त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. नाशिक, पुणे व महाड या तीन ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राणेंविरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर दिवसभर पडसाद उमटले आणि पुढील अटकनाटय़ घडले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane vs shiv sena poster in thane by shiv sena cm uddhav thackeray news srk
First published on: 25-08-2021 at 13:58 IST