Narendra Mehta Allegation on Pratap Sarnaik: राज्यात शिंदे गट आणि भाजपची महायुतीची सत्ता असतानाच, दुसरीकडे महायुतीमध्येच मोठ्याप्रमाणात अंतर्गत वाद उफाळून येत आहे. भाजपचे मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना मेहता यांनी सरनाईक यांचा उल्लेख चक्क सर्वात मोठे भूमाफिया असा केला आहे. त्यामुळे सरनाईक विरुद्ध मेहता हा वाद आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.
भाईंदरपाडा येथे सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचे कर्मचारी आणि काही ग्रामस्थांमध्ये जमीनीच्या वादातून हाणामारी झाली होती. या हाणामारीचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले. दरम्यान, या प्रकरणात भाजपचे मिरा-भाईदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी उडी घेत सोमवारी दुपारी ग्रामस्थांची भेट घेतली.
तसेच ही जमीन बळकविण्याचा सरनाईक यांचा प्रयत्न आहे, असा आरोपही केला. यामुळे शिवसेना आणि भाजपमधील वादही यानिमीत्ताने पहायला मिळाला. मेहता यांनी सरनाईक यांच्यावर थेट भूमाफिया असल्याचा आरोप माध्यमांशी संवाद साधताना केला. आमदार नरेंद्र मेहता हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन घटनास्थळाची पाहणी करण्यास गेले. भूमिपुत्रांवर अन्याय होऊ देणार नाही म्हणत ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान ग्रामस्थ आणि विहंग ग्रुपचे कर्मचारी अशा दोन्ही बाजूंनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
प्रकरण काय?
विहंग ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २० हून अधिकजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमीनीवर जेसीबीच्या साहाय्याने सफाई करत असताना सुरा, लाठ्या, काठ्या, दगड घेऊन काहीजण आले. त्यांनी सुऱ्याचा धाक दाखवून एका कर्मचाऱ्याला धमकी दिली. तर इतर जमावाने लाठ्या, काठ्यांनी मारहाण केली. ही जागा आमची असल्याचे म्हणत धमकावल्याचे म्हटले आहे. तर काही गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विहंग बिल्डर्स एलएलपी आणि विहंग मरीना प्रकल्पातील ८० ते १०० कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जागेवर शिरुन जागेचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यास विरोध केला असता, लोखंडी साहित्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
