शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात श्रीकांत शिंदे यांच्या छोट्या मुलाचा उल्लेख केल्यानंतर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे. दरम्यान, यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडले. तसेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या घराणेशाहीवरील टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?

“उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या मुलाबद्दल जे वक्तव्य केले, ते अत्यंत हीन दर्जाचे, अत्यंत खेदजनक असे वक्तव्य होते. हे विधान धक्कादयक आहे. ज्यावेळी त्यांनी भाषणात हा उल्लेख केला, त्यावेळी आमच्या समोरच श्रीकांत शिंदेंच्या पत्नी आणि त्यांच्या आई बसल्या होत्या. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य ऐकल्यानंतर दोघीही रडायला लागल्या होत्या. केवळ टाळ्या मिळण्याकरिता एका लहान मुलाबद्दल अशा प्रकारे विधान करणं हे अतिशय निंदनिय आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्त नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

हेही वाचा – सुषमा अंधारेंच्या दसरा मेळाव्यातील टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना…”

घराणेशाहीवरील टीकेही प्रत्युत्तर

“ज्यावेळी आदित्य ठाकरे लहान होते. तेव्हापासून आम्ही मातोश्रीवर जातो आहे. आम्ही लहान असल्यापासून आदित्य ठाकरेंना पाहतो आहे. आज आदित्य ठाकरेंना तुम्ही आमदार आणि नंतर मंत्री बनवलं. त्यांचं असं काय कतृत्व होतं? ही घराणेशाही का?” असे प्रत्युत्तरही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

“हे तुम्ही विसरलात का?”

“आनंद परांजपे यांनी शिवसेना सोडली. त्यामुळेच आम्ही श्रीकांत शिंदे यांच्यासाठी तिकीट मागितले होते. श्रीकांत शिंदे यांची खासदारकीसाठी उभं राहण्याची तयारीही नव्हती. त्यावेळी तुम्हीच श्रीकांतने उभे राहावे, असे म्हटले होतं. हे तुम्ही विसरलात का?” असा प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

“उद्धव ठाकरेंचा संयम सुटला आहे”

“उद्धव ठाकरेंनी राजकारण करावं. मात्र, अशा पद्धतीने लहान बाळाला असं राजकारणात ओढू नये. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कालच्या मेळाव्यात गर्दी न जमल्याने उद्धव ठाकरेंचा संयम सुटला आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख केल्याने श्रीकांत शिंदे दुखावले, हात जोडून केली विनंती, म्हणाले “बाळावर माया करणाऱ्या आईचा शाप…”

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले होते. “बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवक पदावर डोळे लावून बसला आहे. त्याला मोठं तर होऊ द्या,” असा उल्लेख उद्धव यांनी आपल्या भाषणात केला होता. यावरून शिंदे कुटुंबाकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh maske replied to uddhav thackeray statement on shrikant shinde son in dasara melava spb
First published on: 06-10-2022 at 22:32 IST