ठाणे : महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजनांद्वारे ठोस काम करत असून नारी शक्ती वंदन विधेयक हा महिलांना राजकीय समानतेकडे नेणारा ऐतिहासिक निर्णय आहे, असे शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला ड्रामा म्हणत असाल, तर सभागृहात उभे राहून ही योजना बंद करण्याची मागणी करा, असे खुले आव्हान म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना दिले.
नारी शक्ती वंदन विधेयक हे भारताच्या लोकशाही प्रवासाला पूर्णत्वाकडे नेणारे ऐतिहासिक पाऊल असून महिलांना निर्णय प्रक्रियेत समान स्थान देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे, असे मत शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. हे विधेयक केवळ एक कायदेशीर प्रक्रिया नसून देशातील महिलांना त्यांचा हक्क देणारा निर्णायक टप्पा आहे. अनेक वर्षे महिलांना केवळ मतदार म्हणून पाहिले गेले, मात्र आता त्यांना सत्तेच्या निर्णय प्रक्रियेत थेट सहभाग मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या विधेयकाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
केंद्र सरकारने महिलांसाठी सक्षमीकरण हा केवळ नारा न ठेवता तो एक ध्येय बनवले आहे. जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमुळे मातृ मृत्यूदरात लक्षणीय घट झाली आहे. ‘वन स्टॉप सेंटर’सारख्या उपक्रमांमुळे महिलांना संरक्षणाचे कवच मिळाले आहे. इतिहास नव्याने घडवला जात आहे. संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना समानतेचा अधिकार मिळावा, असा जो विचार मांडला होता, तो आज प्रत्यक्षात येताना दिसत आहे. संविधानातील संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करून महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
अरविंद सावंतांना खुले आव्हान
सरकारच्या योजनांमुळे दीड कोटींपेक्षा अधिक माता-भगिनींना थेट लाभ मिळाला असून, त्याचे सकारात्मक परिणाम देशभर दिसून येत आहेत. “लाडका भाऊ” म्हणून सरकारने महिलांसाठी प्रामाणिकपणे काम केले, त्यामुळेच जनतेने भरघोस समर्थन देत पुन्हा सत्तेत बसवले, असेही ते म्हणाले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला ड्रामा म्हणत असाल, तर सभागृहात उभे राहून ही योजना बंद करण्याची मागणी करा, असे खुले आव्हान त्यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांना दिले.
काँग्रेस पक्षावर टीका
महिलांच्या हक्कांच्या प्रश्नावर काँग्रेसने पूर्वी दुहेरी भूमिका घेतली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातील निर्णयांचा दाखला देत महिलांना न्याय न मिळाल्याचाही आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ नंतर देशात सामाजिक आणि राजकीय पातळीवर सकारात्मक बदल झाले. नारीशक्तीचा सन्मान करणे हे विकसित राष्ट्राचे लक्षण असून महिलांना आरक्षणाद्वारे संधी दिल्यास संपूर्ण समाज बळकट होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. सर्व पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून या विधेयकाला एकमताने पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
