ठाणे : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना थेट सवाल केला आहे. मिनाक्षी शिंदे स्वतः चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत आहेत. मग दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावे एफआयआरमध्ये असल्याचे सांगितले जाते, तर त्यांच्याबाबत वेगळा न्याय का, असा सवाल म्हस्के यांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येवरून सुरू असलेल्या राजकारणावर शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गटावर जोरदार पलटवार केला. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. पूर्णेकर कुटुंबीयांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. जयनाथ पूर्णेकर आजही माझे मित्र आहेत. त्यामुळे या कुटुंबाला प्रामाणिक न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. या हत्येतील जो कोणी आरोपी असेल, त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.

पूर्णेकर कुटुंबीयांच्या घरी जाण्याची आपली इच्छा होती. मात्र, चुकीचे गैरसमज पसरवण्याचे राजकारण केले जात असल्याने आणि तेथील वातावरण पाहता आम्ही जाणे टाळले. मात्र, मी नक्कीच त्यांच्या घरी जाईन. आम्ही सर्वजण पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखाशी जोडलेले आहोत, असे म्हस्के म्हणाले. बाळू पूर्णेकर स्वतः क्लस्टरच्या बाजूने होते. क्लस्टरच्या मुद्द्यावरूनही आता राजकारण केले जात आहे. आपल्या सोबत ठाणे का नाही, याचे आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावे, असेही त्यांनी सांगितले.

अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न

पूर्णेकर यांच्या हत्येच्या घटनेचा आधार घेऊन ठाकरे गटाचे नेते आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप म्हस्के यांनी केला. ठाण्यात कोणताही गुन्हा घडला की त्याचे खापर एकनाथ शिंदे यांच्यावर फोडले जाते. ठाण्यात झालेल्या पराभवाची जबाबदारीही ते एकनाथ शिंदे यांच्यावर टाकत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यावरील असूयेतून हे राजकारण सुरू आहे, असे ते म्हणाले.

मिनाक्षी शिंदे चौकशीला तयार; मग उद्धव-आदित्य का नाही?

माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी स्वतः पोलिसांच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यामुळे तपासातून सत्य समोर येऊ द्यावे, असे म्हस्के म्हणाले. तुम्ही एफआयआरचा विषय घेत असाल तर दिशा सालियान प्रकरणातील सीबीआयच्या एफआयआरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नावे तपासासाठी नमूद आहेत. मग दोन प्रकरणांमध्ये वेगवेगळा न्याय का, असा सवाल त्यांनी केला. मिनाक्षी शिंदे स्वतःहून चौकशीला सामोरे जातील, तर तुम्हीही दिशा सालियान प्रकरणाच्या तपासाला सामोरे जा,असे आव्हानही म्हस्के यांनी दिले.

संजय राऊत, या प्रकरणात राजकारण करू नका

संजय राऊत यांनी या प्रकरणात राजकारण करू नये. तुम्ही ज्या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरून प्रसारित करीत आहात, त्याबाबत मिनाक्षी शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे पोलिसांचा तपास होऊ द्या, असे म्हस्के म्हणाले. संजय राऊत यांना राष्ट्रीय बातम्यांमध्ये प्रसिद्धी मिळवायची असते म्हणून ते अमित शाह यांचे नाव घेत आहेत. पूर्णेकर कुटुंबीयांवर प्रेम असेल तर त्यांच्या दुःखात सहभागी व्हा. या घटनेवर राजकारण करू नका, अशी टीका त्यांनी केली.

सपना पाटकर यांना काही झाले तर जबाबदार कोण?

सपना पाटकर प्रकरणाचाही उल्लेख करत म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सपना पाटकर यांच्यासोबत आपण कोणत्या पद्धतीने शिवीगाळ केली आहे, हेही पाहावे. उद्या सपना पाटकर यांना काही झाले तर त्याला तुम्हाला जबाबदार धरणार का, असा सवाल त्यांनी केला.

मूळ आरोपी शोधण्याऐवजी राजकारण कशासाठी

दिशा सालियन प्रकरण आणि दिनो मोरिया यांचा उल्लेख करत म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका केली. मिठी नदी प्रकरणात दिनो मोरिया याला अटक करण्यात आली. मिठी नदीचे कंत्राट कसे दिले, कोणी दिले, हे सर्वांना माहीत आहे. दिशा सालियन प्रकरणातही त्याचे नाव आहे. त्यामुळे एखाद्याला अटक झाली म्हणून आता इतरांनाही अटक करा, असे म्हणायचे का, आपल्या बुडाखाली किती अंधार आहे, ते आधी पाहा, असा टोला त्यांनी लगावला. आपला कार्यकर्ता मृत्यूमुखी पडला आहे. त्याच्या हत्येतील मूळ आरोपींचा शोध घेण्याऐवजी कसले राजकारण करत आहात, हत्येचा तपास पोलिसांना करू द्या, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे म्हस्के यांनी सांगितले.