ठाणे : वनमंत्री गणेश नाईक हे गेले काही महिन्यांपासून वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या टीका करत आहेत. नाईक यांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्याचे काम शिवसेना (शिंदे) पक्षातील नेते करत आहेत. परंतू, आता श्रीकांत शिंदे यांनी स्वत: नाईकांना ओपन चॅलेंज दिले आहे. तर, खासदार नरेश म्हस्के यांनी देखील गणेश नाईक यांच्यावर टीका केली आहे. गणेश नाईक यांनी त्यांच्या दोन्ही मुलांचे करिअर बरबाद केले आहे अशी जोरदार टीका म्हस्के यांनी केली आहे.
गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांचा परावभ करण्याचे विधान केले होते. या विधानानंतर शिवसेना (शिंदे) पक्षातील नेते आणखी तापले आणि त्यांनी नाईकांवर टीका करण्यास सुरुवात केली. शिवाय, स्वत: खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना ओपन चॅलेंज केले आहे की, ‘एवढीच खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरा तुमची खुमखुमी पूर्ण करतो,’ असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. त्यापाठोपाठ आता, नरेश म्हस्के यांनी देखील त्यांच्यावर टीका केली आहे.
गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातील तेल संपत आले आहे, दिवा विझताना जसा फडफडतो त्यापद्धतीने ते फडफडत आहेत, असे वक्तव्य म्हस्के यांनी केले. ते पुढे म्हणाले की, श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याची गणेश नाईक भाषा करतात बहुदा ते विसरले आहेत की, श्रीकांत शिंदे हे एकदाही निवडणूकीत पराभूत झालेले नाही. विक्रमी मताधिक्यांनी ते निवडूण आलेले आहेत. परंतू, एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुले नावासमोर खासदार किंवा आमदार लावताना ‘माजी’ हा शब्द लावत आहेत. नाईक हे मुलांचे करिअर बदबाद करणारा बाप आहे, अशा शब्दात म्हस्के यांनी नाईकांवर टीका केली.
दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शब्दाला मान आहे याची कदाचित नाईक यांना पोटदुखी होत असावी, असेही म्हस्के म्हणाले. नाईक यांच्या वयाचा आम्ही सन्मान करतो. परंतू अशा पद्धतीने ते जर टीका करत असतील तर, आम्ही सुद्धा याच पद्धतीने उत्तर देऊ. नवी मुंबईत नाईका यांनी काय काम केले आहे हे सगळ्यांना माहित आहे. ते त्यांच्या पक्षासोबत तरी प्रामाणिक आहेत का ? तीन पक्ष फिरून आलेले आहेत, मुलाला तिकीट नाही दिले म्हणून राष्ट्रवादी मधून लढायला लावले. मंदा म्हात्रे यांना हरवण्यासाठी प्रयत्न केले. आणि ते आम्हाला पक्षनिष्ठता शिकवणार, असा सवाल देखील म्हस्के यांनी उपस्थित केला.

