ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावला होता. त्याला शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत ठाण्याच्या शिवसेनेने गणेश नाईकांचा पराभव केला, हा इतिहास त्यांनी विसरु नये असा टोला लगावला. तसेच नवी मुंबईत कोणाची प्रकृती बिघडत असेल तर ठाण्यातून रुग्णवाहिका पाठवून देऊ, असेही ते म्हणाले.
ठाणे जिल्ह्यात वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध शिंदेची शिवसेना हा संघर्ष पालिका निवडणुक काळात वाढला. या निवडणुकीनंतर दोन्ही बाजूने हा वाद काहीसा शमल्याचे चित्र होते. मात्र, आता हा वाद पुन्हा पेटताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला होता.
काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात होते. पालघर येथे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि शिवसेना उद्धव (ठाकरे) पक्षाचे उपनेते उदय बंधू पाटील यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या टिकेला शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत नाईक यांना टोले लगावले आहेत.
नाईक काय म्हणाले होते
ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा जो इतिहास सध्या सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास सांगायचा झाला तर पहिले जिल्हाप्रमुख मो.दा.जोशी, सतीश प्रधान, साबीर शेख त्याच्यानंतर मी आणि माझ्यानंतर आनंद दिघे होते.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रेरित झालेली तरुण पिढी त्यावेळच्या सत्ताधीशांसोबत संघर्ष करत होती, मी सांगतो आमचे हात साफ आहेत, आमचे मन साफ आहे. मरणाची भीती वाटत नाही, ज्या लोकांना मरणाची भीती वाटत असते, त्यांच्या जीवनात काही अर्थ नसतो, असे नाईक म्हणाले होते. यानिमित्ताने त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली होती.
नरेश म्हस्केंचे प्रत्युत्तर
ठाण्यात आजच अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही ती पाठवून देऊ. कारण प्रकृती अचानकपणे कधी कधी बिघडते आणि नवी मुंबईत तशी व्यवस्था नसेल तर नक्कीच आम्ही रुग्णवाहिका पाठवून देऊ, असा टोला त्यांनी गणेश नाईकांना लगावला. नवी मुंबईत कोणाची प्रकृती बिघडत असेल तर आम्ही गरज पडल्यास ठाण्यातून रुग्णवाहिका पाठवून देऊच पण, ठाण्यात शिवसेनेने गणेश नाईकांचा पराभव केला, हा इतिहास आहे आणि हा इतिहास त्यांनी कधी विसरु नये, असा टोलाही त्यांनी नाईकांना लगावला.
