ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेचाच लढविणार तर, भिवंडीची जागा भाजपाच लढविणार आहे, असे विधान शिंदेच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याची एखाद्याची अतृप्त इच्छा असेल. पण, युतीमुळे ही इच्छा पुर्ण होणार नाही. त्यामुळेच अशा लोकांकडून युतीत मिठाचा खडा टाकण्यात येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाबाबत स्थानिक भाजपाने घेतलेल्या भुमिकेविषयी बंद खोली आड चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगचा गुन्हा नोंदविणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांचे निलंबन होईपर्यंत शिंदे गटाला सहकार्य करायचे नाही आणि त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकायचा असा ठराव कल्याणमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केला आहे. त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वृत्तपत्रात आलेल्या बातम्यानुसार जर काही लोकांनी अशाप्रकारचा ठराव केला असेल तर, त्या लोकांनी भाजपचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची परवानगी घेतली आहे का, असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. विनयभंगच्या तक्रारीवर नंदू जोशी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांचे निलंबन किंवा त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणे हा विषय गृह विभागाचा असून त्याचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी काहीच संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाबाबत स्थानिक भाजपाने घेतलेल्या भुमिकेविषयी बंद खोली आड चर्चा होणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्वच नेते खूप चांगल्या पद्धतीने काम करित आहेत. खालच्या स्तरावर काही ठिकाणी अशा छोट्या-मोठ्या गोष्टी होत असतात. परंतु वरिष्ठ नेते एकत्रित बसून हा तिढा सोडवतील. पक्ष संघटना चालविताना अशा गोष्टी घडत असतात. कदाचित कोणाची कल्याण लोकसभा लढण्याची इच्छा असेल. पण, युतीमुळे ही इच्छा पुर्ण होणार नाही. त्यामुळेच अशा लोकांकडून युतीत मिठाचा खडा टाकण्यात येत आहे. परंतु पक्ष जेव्हा युती करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा व्यापक स्वरूपाचा विचार करतो. त्यामुळे अशा गोष्टींचा युतीवर काहीच परिणाम होणार नाही. तसेच वरिष्ठ नेते एकत्रित येऊन महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सरकार आणण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>Mira Road Murder: सरस्वती वैद्यची हत्या ‘कॉपीकॅट क्राईम’चा प्रकार? श्रद्धा वालकर प्रकरणाशी किती साधर्म्य?

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी निरीक्षक आणि संयोजन नेमलेले आहेत. जे मतदार संघ शिवसेनेकडे आहेत, त्या ठिकाणी हे निरिक्षक आणि संयोजक शिवसेना उमदेवाला मदत करणार आहेत. एखादा मतदार संघ आपण लढवत नसलो तरी त्या ठिकाणी पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येक पक्ष काम करीत असतो. तसाच प्रयत्न शिवसेनेकडूनही करण्यात येणार आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय निरीक्षकांच्या तसेच संपर्कप्रमुखांच्या नेमणुका करण्यात येणार असून त्याची यादी येत्या काही दिवसातच जाहीर होईल. येत्या १३ जूनला लोकसभा मतदार संघनिहाय आमची बैठक होणार आहे. त्यात प्रत्येक मतदारसंघाची परिस्थिती आणि तिथे निवडणुकीच्या दृष्टीने कशा पद्धतीने नियोजन करायला पाहिजे, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असेही म्हस्के म्हणाले. ठाणे, कल्याण लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेनेचाच लढवणार तर, भिवंडीची जागा भाजपाच लढणार आहे. या तिन्ही जागा तिन्ही जागा रेकॅार्ड ब्रेक मतांनी निवडून आणणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naresh mhaske statement that shiv sena will contest in thane kalyan lok sabha amy
First published on: 09-06-2023 at 16:48 IST