ठाणे – पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेविरोधात ठाण्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना शाखा आणि महिला आघाडीच्या वतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
नसरापूर येथे ६५ वर्षीय आरोपीने चिमुकलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ ठाण्यातील शिवसेना शाखा व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निषेधार्थ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेत आरोपीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच आरोपीचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला.
यावेळी बोलताना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना समाजाला काळिमा फासणाऱ्या असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. गुन्हेगाराला जात, धर्म नसतो. अशा विकृतींना जातीय रंग देणे चुकीचे आहे. तसेच, या प्रकरणाची फास्टट्रॅक न्यायालयात सुनावणी करून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यास तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी आरोपीवर गुन्हे दाखल असूनही कठोर कारवाई न झाल्यानेच अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. वेळीच कठोर कारवाई झाली असती, तर आज त्या चिमुकलीचा जीव वाचला असता.
आज देखील आजोबाने आपल्या नातवावर अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही मानसिकता बळावते का तर कायदा आपला कठोर नाही. कायद्याच्या चौकटीत राहून आपण काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. समाजात अशा विकृत मानसिकतेला आळा घालण्यासाठी कायदा अधिक कठोर होण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
बदलापूरप्रमाणे तत्काळ कारवाई केल्यास समाजात वचक निर्माण होईल आणि अशा घटनांवर आळा बसू शकतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोप-प्रत्यारोप करून काहीही साध्य होणार नाही, तर एकजुटीने अशा विकृतींना आळा घालावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नेमके प्रकरण काय ?
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मे २०२६ च्या सुरुवातीला एका चिमुकलीवर ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपीने ४ वर्षांच्या बालिकेला ”वासरू दाखवतो” असे सांगून गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर परिसरात मोठा असंतोष निर्माण झाला. लोकांचा संताप पाहता, आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जात आहे. घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी महामार्ग रोखून धरला होता. महिला कार्यकर्त्यांनी आरोपीला न्यायालयात नेणाऱ्या पोलिसांच्या गाडीसमोर निदर्शने केली.
