आंबिवली रेल्वे स्थानकाला ‘चिमणी’चा धोका

आंबिवली रेल्वे स्थानकात लष्कराच्या वतीने नवा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.

नॅशनल रेयॉन कंपनीचे अजस्र धुराडे कोसळण्याच्या बेतात; आधारासाठी बसवलेल्या पट्टय़ाही निखळू लागल्या..

आंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला बंद अवस्थेत असलेल्या नॅशनल रेयॉन कंपनीच्या (एन.आर.सी.) धोकादायक चिमणीमुळे रेल्वे प्रवासी आणि  स्थानिकांचा जीव धोक्यात आहे. रेल्वेस्थानकाला लागूनच असलेल्या या चिमणीचे बांधकाम निखळू लागले असून तिच्याभोवती बसवलेल्या लोखंडी पट्टय़ाही खाली पडू लागल्या आहेत. धोकादायक अवस्थेतील ही चिमणी स्थानकावर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

आंबिवली रेल्वे स्थानकात लष्कराच्या वतीने नवा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. त्याआधी सध्या जुन्या पादचारी पुलाच्या दुरुस्तीचे कामही सुरू आहे. मात्र त्याचबरोबर या धोकादायक चिमणीचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. एनआरसी कंपनीच्या चिमणीला तडे गेले आहेत. तसेच तिचे बांधकाम निखळू लागले आहे. त्यामुळे ही चिमणी धोकादायक अवस्थेत असून ती कधीही कोसळू शकेल. तसे झाले तर फार मोठा अनर्थ घडू शकेल, अशी भीती रहिवासी व्यक्त करीत आहेत.

आंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला एनआरसी कंपनी आहे. १९४५ला सुरू झालेल्या या कंपनीत एकेकाळी रेयॉन आणि नायलॉनचा धागा बनत होता. आशिया खंडातील ही सर्वात मोठी कंपनी होती. मात्र, आर्थिक डबघाईला आल्यानंतर २००९ ला या कंपनीला टाळे ठोकण्यात आले. तेव्हापासून ही कंपनी तशीच बंदावस्थेत पडून आहे. मात्र, या कंपनीची एक चिमणी धोकादायकरीत्या आंबिवली रेल्वे स्थानकापासून अगदी १० पावलांच्या अंतरावर उभी आहे. सुमारे ५० फूट उंच असलेल्या या चिमणीला भेगा पडल्या आहेत. या भेगा रुंदावू नयेत, यासाठी चिमणीभोवती लोखंडी पट्टय़ा ठोकून ती बांधून ठेवण्यात आली. मात्र, आता या पट्टय़ाही निसटून खाली रस्त्यावर पडू लागल्या आहेत. चार वर्षांपूर्वी येथे जोराच्या वादळी पावसात चिमणीचा थोडासा भाग सरकला होता. त्यामुळे आम्ही स्थानिक घरदार सोडून लांब पळालो होतो. मात्र, सुदैवाने त्यावेळी कोणतीही दुर्घटना झाली नाही, असे येथील रहिवासी चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही या चिमणीविषयी रेल्वे आणि पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर काही दिवसांपूर्वीच रेल्वे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्थानकाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना ही चिमणी धोकादायक स्थितीत असल्याचे आढळून आले. प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिमणीचा तातडीने बंदोबस्त व्हायला हवा.

रमण तरे, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: National ryan company chimney issue in ambivali station