scorecardresearch

राष्ट्रवादी काँग्रेस लढायला घाबरत नाही – आनंद परांजपे

महाविकास आघाडीबाबत शिवसेनेने काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा निर्णय आहे. परंतु आमच्या पक्षाचे नेते महाविकास आघाडीबाबत जो निर्णय घेतील, त्याचे आम्ही पालन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.

नीलेश पानमंद

ठाणे : महाविकास आघाडीबाबत शिवसेनेने काय निर्णय घ्यावा, हा त्यांचा निर्णय आहे. परंतु आमच्या पक्षाचे नेते महाविकास आघाडीबाबत जो निर्णय घेतील, त्याचे आम्ही पालन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली. तसेच महाविकास आघाडी झाली नाहीतर पालिकेच्या संपूर्ण जागा लढविण्याची तयारी असून राष्ट्रवादी लढायला घाबरत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कळवा येथील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर आघाडी नकोच अशी भूमिका शिवसेनेने घेतली असून त्याचबरोबर स्वबळावर निवडणूक लढल्यास कळवा परिसरातून सर्वाधिक नगरसेवक निवडून येतील, असा दावा शिवसेनेने केला आहे. याबाबत आनंद परांजपे यांना विचारले असता, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा पराभव झाला असला तरी, त्यांना कळवा परिसरातून चांगले मताधिक्य मिळाले होते.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर शिवसेनेच्या दीपाली भोसले-सय्यद या उमेदवार होत्या. या निवडणुकीत मंत्री आव्हाड हे ७८ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्ष निवडून आला आहे. कळवा भागात राष्ट्रवादी पक्षाची ताकद असून या भागात १६ पैकी ९ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. यंदाच्या निवडणुकीत ही संख्या वाढेल, असा दावाही त्यांनी केला. ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाविरोधात नव्हे तर पालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात आम्ही आंदोलन करीत असतो. ठाणेकरांच्या  हिताचे मूलभूत प्रश्न राष्ट्रवादी पक्षाकडून उचलून धरले जात आहेत. पालिकेच्या माध्यमातून ठाणेकरांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात हा त्या मागचा हेतू आहे. प्रशासनाच्या कारभाराविरोधात आंदोलन करीत आहोत. प्रशासकीय कारभारावर सत्ताधारी शिवसेनेचा वचक नसेल आणि त्यामुळे प्रशासनाविरोधात आंदोलन केले तर ती राष्ट्रवादीची चूक आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 एमएमआरडीए घर घोटाळा प्रकरणी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पकडले आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये आवाज उठवायचा नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मैत्री स्वार्थी आहे की नाही, हे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे दोन्ही नेते ठरवतील. त्यावर मी काहीच भाष्य करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nationalist congress afraid fight ysh

ताज्या बातम्या