कलानी गटाची राष्ट्रवादीच्या डोळ्यात धूळफेक?

मागील चार दिवसांपासून उल्हासनगर शहरातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि कलानी कुटुंबाभोवती फिरत आहे.

रिपाइं, पीआरपी गटाच्या नावांचा चुकीचा समावेश; आठच नगरसेवकांनी प्रवेश केल्याचा भाजपचा दावा

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा गाजावाजा करत उल्हासनगरातील टीम ओमी समर्थक २२ नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिल्याचा जंगी सोहळा ठाण्यात बुधवारी उरकला असला तरी पक्षाच्या आठच नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्याचा दावा भाजपने केला आहे. बुधवारी सायंकाळीच या यादीतील दोन नगरसेवकांची नावे चुकीने आल्याचा खुलासा टीम ओमी कलानीनेही केला आहे, तर याच २२ जणांच्या यादीतील पंचम कलानींनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असून थेट नगरसेवक नसलेले स्वीकृत सदस्य आणि परिवहन समिती सभापतींचे नाव नगरसेवकांच्या यादीत घुसवण्यात आल्याचे समोर आले.

मागील चार दिवसांपासून उल्हासनगर शहरातील राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि कलानी कुटुंबाभोवती फिरत आहे. बुधवारी राज्याच्या गृहनिर्माणमंत्र्यांनी ठाण्यात एका जंगी कार्यक्रमात उल्हासनगरातील २२ कलानी समर्थक आणि कागदोपत्री भाजपच्या असलेल्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याचे सांगितले. यातील काही नगरसेवक कायदेशीर    अडचणींमुळे येऊ शकले नसल्याची सबब पुढे करत त्यांनी वेळ मारून नेली. त्यामुळे मूळ नगरसेवकांऐवजी त्यांच्या नातेवाईकांनीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने केलेल्या २२ नगरसेवकांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बुधवारी सायंकाळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक प्रमोद टाळे यांनी एक चित्रफीत प्रसारित करत माझे नाव त्या २२ नगरसेवकांच्या यादीत चुकून आल्याचे सांगत मी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. काही वेळातच टीम ओमी कलानींचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक मंलग वाघे आणि पीआरपीचे प्रमोद टाळे यांची नावे चुकून समाविष्ट झाल्याचे मान्य केले. परिवहन समिती सभापती असलेले दिनेश लाहिरानी हे नगरसेवक नाहीत. तसेच मनोज लासी हे भाजपचे स्वीकृत नगरसेवक आहेत. अशी पाच नगरसेवकांची नावे नगरसेवकांच्या यादीतून बाद झाली. त्यामुळे कलानी गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोळ्यात धूळफेक केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

नावे जाहीर  करण्याचे आव्हान

शिवसेनेच्या उमेदवाराला महापौरपदाच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या भाजपच्या टीम ओमी कलानी समर्थक नऊ नगरसेवकांचे अपात्रतेचे प्रकरण कोकण विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे. त्या प्रकरणी ३० नोव्हेंबरपूर्वी निकाल देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांच्याशिवाय एकाही भाजप नगरसेवकाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष जमनादास पुरस्वानी यांनी सांगितले आहे. टीम कलानीने २२ नगरसेवकांची नावे आणि छायाचित्र जाहीर करण्याचे आव्हान पुरस्वानी यांनी केले आहे. या दाव्यावर राष्ट्रवादीने अद्याप प्रतक्रिया दिलेली नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nationalist congress party 22 corporators in the party pancham kalani chairman of the transport committee akp

ताज्या बातम्या