ठाणे : दिवाळीच्या जल्लोषात बाजारपेठा रोषणाईने उजळल्या असताना नौपाडा येथील व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने व्यापारी मंडळाने मुख्यमंत्री दुष्काळ निधीसाठी चार लाख एक हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
ठाण्यातील नौपाडा आणि गोखले रोड परिसर ही शहरातील प्रमुख व्यापारी केंद्रे म्हणून ओळखली जातात. दिवाळीच्या काळात या बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दरवर्षी व्यापारी मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाई, सजावट आणि विविध सवलतींसह शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा व्यापारवृद्धीबरोबरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आर्थिक योगदान देत व्यापाऱ्यांनी उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली आहे.
नौपाडा व्यापारी मंडळाच्या वतीने आयोजित ”नौपाडा शॉपिंग फेस्टिव्हल २०२६”चा शुभारंभ गोखले रोडवरील के. के. टेलिकॉमजवळ आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आला. विविध वेशभूषांतील कार्टून पात्रांची चलचित्रे लहानग्यांसह ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या स्वागतासाठी गोखले रोडची बाजारपेठ सज्ज झाली आहे.ठाणेकरांच्या खरेदीचे प्रमुख केंद्र असलेल्या गोखले रोड परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सोने-चांदी तसेच वाहन खरेदीसाठी ग्राहकांची मोठी पसंती असते.
यंदाच्या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून विविध सवलती देण्यात येणार आहेत. विशेषतः सोन्या-चांदीच्या घडणावळीवर सूट देण्यासह अन्य वस्तूंच्या खरेदीवरही आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, बाजारपेठेतील व्यापाराला चालना देण्यासोबतच सामाजिक प्रश्नांप्रती संवेदनशीलता जपण्याचा प्रयत्न व्यापारी मंडळाने केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, या उद्देशाने चार लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मितेश शहा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
नवीन बांधकामे उभारताना बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे योग्य नाही. मात्र, बांधकामे पूर्ण झाल्यानंतर तेथे वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नव्या गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. या माध्यमातून लवकरच मार्ग निघून शहराला मुबलक पाणी उपलब्ध होईल. याशिवाय, शहरातील जुन्या विहिरींची स्वच्छता करून त्यातील पाणी वापरासाठी उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती शिवसेनेचे ठाणे महापालिकेतील गटनेते पवन कदम यांनी दिली.
