वाशी स्थानकातून पळवलेला ३ वर्षांचा मुलगा कळव्यात सापडला | Loksatta

वाशी स्थानकातून पळवलेला ३ वर्षांचा मुलगा कळव्यात सापडला

तो आपल्या आईसोबत वडापावच्या स्टॉलजवळ थांबला होता.

वाशी स्थानकातून पळवलेला ३ वर्षांचा मुलगा कळव्यात सापडला
3 year old child abducted from vashi railway station found in Kalwa : रेल्वे स्थानकाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणकर्ता कैद झाला होता.

नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकातून तीन दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलेला रघु शिंदे हा तीन वर्षांचा मुलगा अखेर सापडला आहे. अपहरणकर्त्याने रघुला कळव्यात आणून सोडले होते. त्यानंतर एका महिलेने रघुला रस्त्यावर फिरताना पाहिले होते. तिने पोलिसांना याबद्दल कळवले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रघुला ताब्यात घेतले. रघुला त्याच्या पालकांकडे सोपवण्यात आले असून तो सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, रघुला पळवून नेणाऱ्या व्यक्तीचा शोध लागू शकलेला नाही. पोलीस वाशी स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या आरोपीचा शोध घेत आहेत.

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकाजवळील वडापावच्या स्टॉलजवळून रघुचे अपहरण करण्यात आले होते. तो आपल्या आईसोबत वडापावच्या स्टॉलजवळ थांबला होता. त्याची आई वडापाव विकत घेण्यासाठी गेली असता अपहरणकर्त्याने त्याला पळवले. रेल्वे स्थानकाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपहरणकर्ता कैद झाला होता. सीसीटीव्हीत तो दारूच्या नशेत असून रेल्वे फलाटावरून जाताना दिसत होता. यावेळी रघु त्याच्या कडेवर होता. रघुला घेऊन तो पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढला असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र, रघुचे अपहरण करणारा तो अज्ञात व्यक्ती अद्याप फरार आहे. या व्यक्तीने रघुचे अपहरण केले नसावे, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अपहरण करणारा अज्ञात व्यक्ती कोण होता? त्याने रघुचे अपहरण कोणत्या कारणासाठी केले? त्याचा उद्देश काय? भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील हा इसम होता का? याचा शोध पोलिस घेत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2017 at 12:33 IST
Next Story
जोखीम क्षमतेप्रमाणे गुंतवणुकीतून अर्थनियोजनाचा मार्ग