Navi Mumbai Airport DB Patil Name Proposal: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव लवकरात लवकर दिले जाणार आहे, याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी दिल्याची माहिती भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांनी दिली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव दिले जावे यासाठी आगरी-कोळी समाजाने अनेक आंदोलने केली. तरीही या विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले नाही. त्यामुळे दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळास केव्हा दिले जाणार असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार बाळ्या मामा यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच यासंदर्भात पाठपुरावा सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव देण्यात यावे या संदर्भात अनेक वेळा संसदेत मागणी केली आहे. मागील आठवड्यात स्वतः केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांची भेट घेतली.
अनेक वर्षांपासून कॅबिनेटमध्ये न आलेला प्रस्ताव आता लवकरच कॅबिनेटमध्ये सादर होणार असून याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही आपल्याला केंद्रीय उड्डाण मंत्री नायडू यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव मिळणार असून हा येथील स्थानिक भूमिपुत्रांचा विजय असल्याचे मत यावेळी खासदार म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर थांबा
– लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबत नसल्याने भिवंडीतील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याची बाब देखील केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसमोर मांडली असून दिवा वसई या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या सात गाड्यांपैकी तीन गाड्या भिवंडी रोड रेल्वे स्थानकात थांबणार आहेत, त्यामुळे येथील प्रवाशांची गैरसोय दूर होणार असून वाशिंद येथील तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गीकेचे काम पूर्ण झाल्या नंतर दिवा वसई मेमु ट्रेन थेट मुंबई सीएसटी पर्यंत नेता येणार असल्याचे आश्वासन आपणास रेल्वे मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती खासदार म्हात्रे यांनी यावेळी दिली.
