ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागेपर्यंत आपण शांत बसू नका, असा निर्धार भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी मंगळवारी सागरी भूमिपुत्र महासंघाच्या स्थापना कार्यक्रमात बोलताना केला. दि. बा. पाटील हे भूमिपुत्रांचा श्वास, अभिमान आणि स्वाभिमान असल्याचे सांगत त्यांनी यानिमित्ताने नामकरणासाठी पुढील काळात आंदोलनाची दिशा ठरविण्याचे संकेत दिले.

सागरी भूमिपुत्र महासंघाच्या स्थापना सोहळ्यात म्हात्रे यांनी भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रश्न अनेक वेळा मांडण्यात आला आहे. त्यांचे नाव का द्यावे हेही सांगण्यात आले. दि. बा. पाटील हे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. त्यांनी खासदार म्हणून काम केले, विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांभाळली. भूमिपुत्रांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे दि. बा. पाटील हे आमच्या समाजाचा श्वास, अभिमान आणि स्वाभिमान आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळेपर्यंत आपण शांत बसता कामा नये, असे म्हात्रे यांनी सांगितले. विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न केवळ नामकरणापुरता मर्यादित नसून भूमिपुत्रांच्या अस्मितेशी जोडला असल्याचे स्पष्ट केले.

आम्ही प्रकल्पमालक का होऊ शकत नाही

– मुंबई महानगर प्रदेशात मोठमोठे विकास प्रकल्प येत असताना स्थानिकांच्या जमिनी घेतल्या जातात आणि त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून संबोधले जाते. परंतु आम्ही प्रकल्पग्रस्त का, आम्ही प्रकल्पमालक का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

– विकास प्रकल्प उभारण्यासाठी जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांना त्या प्रकल्पातील रोजगार आणि व्यवसायाच्या संधींमध्ये योग्य सहभाग मिळतो का, याचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गावठाण विस्ताराचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

– नवी मुंबईतील विकास प्रकल्पांमधील व्यवसाय, वाहतूक आणि रोजगाराच्या संधींमध्ये भूमिपुत्रांचा किती वाटा आहे, याची माहिती संकलित करून त्याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील महिन्यात या प्रश्नांचा अभ्यास करून आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

– मुंब्रा परिसरातील प्लॉट, रेती व्यवसाय बंद झाल्यानंतर सुरू झालेले व्यवसाय आणि त्यातील भूमिपुत्रांचा सहभाग याचाही आढावा घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. याठिकाणी भूमिपुत्रांचा वाटा कमी असेल तर तो त्यांच्या हक्काचा आणि अधिकाराचा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले.

भूमिपुत्रांना एकजुटीचे आवाहन

ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये एमएमआरडीए तसेच अन्य यंत्रणांच्या माध्यमातून विविध प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पांसाठी जमिनी जाणाऱ्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनीवरील आरक्षण, प्रकल्प आणि इतर प्रश्नांची माहिती महासंघाकडे द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. शांत बसायचे की एकत्र येऊन आपल्या प्रश्नांसाठी लढायचे, हे आपण ठरवले पाहिजे, असे सांगत त्यांनी भूमिपुत्रांना एकजुटीचे आवाहन केले. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महासंघाच्या माध्यमातून पुढील काळात आंदोलनात्मक भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी दिले. भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर अन्याय किंवा दडपशाही झाली, तर त्याविरोधात सर्वांनी एकत्र उभे राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.